राज्यात कुठे पाऊस, कुठे दुष्काळाचं सावट; गणरायाच्या आगमनापूर्वी अनेक जिल्ह्यांना पावसाचा तडाखा

Rain Update: गोसेखुर्द धरणाचे 7 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून 33,876 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

News Photo   2026 09 13T190927.159

Maharashtra Rain Update

Rain Update : गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर (Rain) वसई-विरारमध्ये रात्रभर पावसाची संततधार सुरू आहे. रिमझिम पावसासोबत अधूनमधून जोरदार सरी कोसळत असल्याने काही सखल भागात पाणी साचलं आहे. वर्धा जिल्ह्यातही सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू असून समुद्रपूर तालुक्यात सावंगी आणि पिंपरी परिसरातील नाल्यांना पूर आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. गोसेखुर्द धरणाचे 7 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून 33,876 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

दरम्यान, मराठवाड्यात मात्र पावसाअभावी शेतकऱ्यांची चिंता कायम आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यातील सांडस-चिंचोली येथील शेतकरी माऊली कदम यांनी पाऊस न झाल्याने सोयाबीनला शेंगाच न आल्याने उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवलं. या घटनेतून अवर्षणामुळे पिकांची झालेली अवस्था आणि शेतकऱ्यांसमोरील आर्थिक संकटाची तीव्रता स्पष्ट झाली आहे. दुसरीकडे, मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटीतील आंदोलनस्थळीही जोरदार पावसाने हजेरी लावली. मंडपात पाणी साचल्याने आंदोलकांची गैरसोय झाली.

पावसाच्या तुटीचा मराठवाड्याच्या शेतीला फटका; 3.5 लाख हेक्टर क्षेत्र घटलं, वाचा चिंताजनक आकडेवारी

सोलापूरमध्ये जून-जुलैमध्ये पेरणीनंतर अपेक्षित पाऊस न झाल्याने अनेक भागातील पिकं करपू लागली आहेत. परिस्थितीचा वस्तुनिष्ठ आढावा घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांची पथकं शेतकऱ्यांच्या बांधावर पाठवली आहेत. 12 आणि 13 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यांमध्ये पाहणी केली जाणार असून त्यानंतर दुष्काळसदृश्य परिस्थितीचा अहवाल शासनाला पाठवला जाणार आहे. धुळे शहरातही तब्बल 43 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पहाटेपासून पावसाची रिमझिम सुरू झाली. त्यामुळे काही पिकांना दिलासा मिळाला असला तरी कपाशीच्या बोंडांवर रोगाचा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

वाशिम जिल्ह्यात मध्यरात्रीपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू झाला असला तरी 70 टक्क्यांपेक्षा अधिक पिकं आधीच करपली आहेत. उर्वरित 30 टक्के पिकांना या पावसाचा काहीसा फायदा होण्याची शक्यता आहे. कारंजा, मानोरा, मंगरुळपीर, वाशिम आणि मालेगाव तालुक्यात 40 ते 45 दिवसांनंतर पाऊस झाला, तर रिसोडमध्ये 25 दिवसांनी पावसाचं आगमन झालं. त्यामुळे राज्याच्या काही भागात पावसामुळे दिलासा मिळत असताना दुसरीकडे अवर्षणाचं संकट कायम असल्याचं चित्र आहे.

Exit mobile version