Download App

पुढचे 12 तास धोक्याचे! 16 जिल्ह्यांना रेड अलर्ट, समुद्रातून उसळणार 4 मीटरच्या लाटा; CM फडणवीसांचं टेन्शन वाढलं

Red alert for 16 districts CM Fadnavis Information : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने (Heavy Rain) हाहाकार माजवला आहे. अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती (Flood) निर्माण झाली असून शेती, घरं, जनावरं या सर्वांचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील काही दिवस हा पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (CM Devendra Fadnavis) माध्यमांशी संवाद साधला.

नद्यांनी इशारा पातळी ओलांडली

मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाशी सतत संवाद सुरू आहे. 15 ते 16 जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. कोकणात रेड अलर्ट जारी असून अंबा, कुंडलिका आणि जगबुडी नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. या भागातील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. मी स्वत: नांदेड जिल्हाधिकार्‍यांशी सातत्याने संपर्कात असून, नांदेड, लातूर आणि बिदर असे तिन्ही जिल्हाधिकारी एकमेकांशी संपर्कात राहून बचाव कार्य करीत आहेत. नांदेड, लातूर आणि बिदर जिल्ह्यांमध्ये प्रशासन एकत्रितपणे बचाव कार्यात गुंतले आहे. एनडीआरएफची एक तुकडी, लष्कराचे पथक तसेच पोलीस दल स्थानिक प्रशासनाच्या समन्वयातून मदतकार्य करत आहेत. छत्रपती संभाजीनगरमधून सैन्याची आणखी एक तुकडी रवाना करण्यात आली आहे.

अजितदादांचे ‘भावकी प्रेम’ राम शिंदेंच्या जिव्हारी! पवार-शिंदे वादाला नवे वळण?

मुंबईत पावसाचा तडाखा

मुंबईत गेल्या दोन दिवसांत जवळपास 200 मिमी पावसाची नोंद झाली. त्यातच आज काही तासांतच 170 मिमीपेक्षा अधिक पाऊस कोसळला आहे. त्यामुळे मुंबईत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, लोकल सेवा पूर्णपणे बंद नाहीत, मात्र काही गाड्या उशिरा धावत आहेत. पुढील 10 ते 12 तास पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. खबरदारी म्हणून दुपारनंतर शाळांना सुट्टी दिली असून मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना देखील घरी जाण्याची मुभा देण्यात आली आहे.

चिकन, मटण अन् माजी आमदार फारुख शाह यांना टोला; धुळ्यात इम्तियाज जलील यांनी सभा गाजवली

समुद्रात उसळणार प्रचंड लाटा

आज संध्याकाळी तीन मीटर आणि उद्या चार मीटरपर्यंत समुद्राच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. यामुळे समुद्राची पातळी व पावसाचं पाणी एकत्र येऊन पूरस्थिती गंभीर होऊ शकते. मुंबई महापालिकेकडून मोठ्या प्रमाणात पाणी पंपिंगची व्यवस्था केली आहे. नागरिकांनी धोकादायक ठिकाणी जाण्याचं टाळावं, विशेषतः समुद्रकिनाऱ्यावर लाटांचा आनंद घेण्याच्या मोहाला बळी पडू नये, असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं.

पावसाच्या स्थितीचा आढावा घेत शाळांना पुढील सुट्ट्यांचा निर्णय संध्याकाळी मिळणाऱ्या ताज्या अलर्टनुसार घेतला जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

 

follow us