अजितदादांचे ‘भावकी प्रेम’ राम शिंदेंच्या जिव्हारी! पवार-शिंदे वादाला नवे वळण?

अजितदादांचे ‘भावकी प्रेम’ राम शिंदेंच्या जिव्हारी! पवार-शिंदे वादाला नवे वळण?

Ram Shinde Displeasure with Ajit Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) पवार कुटुंबाचा आजही एक वेगळा दबदबा आहे. याच पवार कुटुंबामधील युवा नेतृत्व म्हणजेच रोहित पवार (Rohit Pawar) यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे राम शिंदे यांचा (Ram Shinde) पराभव केला. 2024 च्या निवडणुकीमध्ये जोरदार तयारी करत भूमीपुत्राचा नारा देत शिंदेंनी रोहित पवार विरोधात डावपेच टाकले. मात्र, नशिबाने साथ दिली नाही. परत देखील शिंदेंना पराभवाला सामोरे जावे लागले. विधानसभा संपली, मात्र पराभवाची खदखद शिंदेंच्या मनात सलत राहिली. यामध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांची एंट्री झाली. आपल्या पराभवाला अजित पवार हेच जबाबदार असल्याचे शिंदे यांनी वारंवार बोलून दाखवले. यातच एका नुकत्याच झालेल्या कार्यक्रमामुळे शिंदे-विरुद्ध पवार हा वाद आता वाढण्याची शक्यता आहे. यातच फडणवीसांचे विश्वासू असलेले शिंदे यांनी याबाबत थेट फडणवीसांकडे देखील तक्रार केली. तर नेमकं हे प्रकरण आहे तरी काय? हेच आपण सविस्तर जाणून घेऊ या.

मराठवाड्यात पावसाचा हाहाकार; गुरं ढोरं वाहून गेली, अनेकांचा मृत्यू, कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती?

वादाची ठिणगी कशी पेटली?

कर्जत – जामखेड हा भाजपचा बालेकिल्ला समजला जात असे. भाजपचे पक्षनिष्ठ अशी ओळख असलेले राम शिंदे याच मतदार संघातून निवडून आले, तसेच मंत्री देखील झाले होते. मोठा राजकीय अनुभव असलेले शिंदे यांच्यासाठी 2019 ची निवडणूक सोपी अशीच होती. कारण नवखे असलेले रोहित पवार हे त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार होते. नवखे जरी असले, तरी मात्र शरद पवार यांच्या तालमीत तयार झालेले रोहित पवार यांना घरातूनच राजकारणाचे बाळकडू मिळाले. यामुळे रंगतदार अन् प्रतिष्ठेची बनलेल्या या 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पवार यांनी राम शिंदे यांचा पराभव केला. खऱ्या अर्थाने शिंदे विरुद्ध पवार यांच्यामध्ये संघर्षाची वात पेटली.

2024 निवडणुकीत पुन्हा पराभव…

2019 च्या निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी शिंदे यांनी जोरदार तयारी केली. भूमिपुत्राची टॅगलाईन हाती घेत बारामतीचे पार्सल म्हणत रोहित पवार यांना डिवचण्यास सुरुवात केली. विजयाचा विश्वास असलेले शिंदे यांनी पवार यांना राजकीय डावपेच आखात खिंडीत गाठण्यास सुरुवात केली. अखेर निवडणूक झाली अन् निकाल जाहीर झाला. पुन्हा एकदा काही मतांच्या फरकाने शिंदे यांचा पुन्हा पराभव झाला. रोहित पवार पुन्हा एकदा वरचढ ठरले.

रोहित पवार आज्यावर गेला आहे, त्याच्या आजोबांनी गेली 50 वर्षे सोनं म्हणून पितळ विकले

अजितदादांची वक्तव्ये शिंदेंच्या जिव्हारी लागले

अजित पवार आणि रोहित पवार कराडमधील प्रीतीसंगमावर समोरा-समोर आले. यावेळी अजित पवार यांनी रोहित पवारांना, ‘ढाण्या थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर, काय झालं असतं, असा अजित पवारांनी रोहित पवारांना मिश्कील टोला लगावला. विधानसभा निवडणुकीवेळी अजितदादांची सभा कर्जत जामखेडमध्ये झाली असती तर, निकाल वर-खाली झाला असता, अशी कबुली खुद्द रोहित पवारांनी दिली. यामुळे रोहित पवार यांना अजित दादांची साथ असल्याचे बोलले गेले व यावरून राम शिंदे हे आक्रमक झाले. त्यांनी याबाबत वारंवार वरिष्ठांकडे तक्रार देखील केली.

पवारांकडून जुन्या कढीला ऊत…

शिंदेंचा पराभव झाला मात्र पक्षाशी एकनिष्ठ असलेले शिंदे यांचे भाजपने पुनर्वसन केले. शिंदे यांना विधान परिषदेच्या सभापतीपदी बसविले. शिंदे – पवार हा वाद संपला असे चित्र असताना परत एका कार्यक्रमात अजित पवारांच्या वक्तव्याने या वादाला सुरुवात झाली. अजितदादा गावकीचा विचार करताना भावकीला मात्र विसरले, असं वक्तव्य रोहित पवार यांनी केले. याला प्रत्युत्तर देताना अजित पवार म्हणाले, भावकीकडे लक्ष दिलं म्हणून तू आमदार झालास. आपण बॅलेट पेपरवर निवडून आला आहे, असं पवार म्हणाले. अजितदादांच्या सहकार्याने रोहित पवार आमदार झाले असेच यातून वारंवार अधोरेखित झाले. यामुळे शिंदे यांनी देखील आपली नाराजी जाहीर व्यक्त केली.

माझ्या पराभवामागे अघोषित करार

अजित पवार ते वक्तव्य करून सातत्याने मला ‘टॉर्चर’ करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे याबाबतीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा. अजित पवार हे वक्तव्य सातत्याने पुन्हा-पुन्हा करून शिळ्या कढीला ऊत का आणतायेत? असा सवाल राम शिंदेंनी केला आहे. तसेच राजकीय सारीपाटात मी बळी ठरलोय. अजित पवार यांनी हे वारंवार बोलून दाखवले आहे त्यामुळे यावर मी भाष्य केले. कौटुंबिक कलाह दरम्यान काही करार झाले, त्याचे प्रत्यय कर्जत-जामखेडमध्ये जाणवला, अशा शब्दांत राम शिंदे यांनी अजित पवार यांच्याबाबत आपली नाराजी उघडपणे जाहीर केली. दरम्यान यावर आता येणाऱ्या काळात काही राजकीय पडसाद पडतात का? हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube