Download App

…हे पंतप्रधांनाना शोभत नाही; राज ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल

मुंबई : देशाचे पंतप्रधान म्हणून सर्व राज्यांना सारखा न्याय दिला पाहिजे. आपण गुजराती आहात म्हणून गुजरातवर विशेष प्रेम करणे तसेच त्याला प्राधान्य देणे हे चुकीचे आहे. हे एका पंतप्रधानाला शोभणारे कृत्य नाही अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर शाब्दिक हल्लाबोल केला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात आहे. पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान राज ठाकरे यांनी मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. राज म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाकडे लक्ष दिले पाहिजे. सर्व राज्यांना आपल्या मुलासारखा समान न्याय दिला पाहिजे. आपण गुजराती आहोत म्हणून गुजरात राज्याला विशेष प्राधान्य देणे चुकीचे आहे. हे पंतप्रधानांची एक अशोभनीय कृत्य आहे.

तसेच पुढे बोलताना राज ठाकरे यांनी राज्यातील प्रकल्प बाहेर गेले यावरून देखील टीका केली. राज म्हणाले, तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग हे पंजाबी होते म्हणून त्यांनी सगळं पंजाबला घेऊन जायचं का? दुसरा कोणी तामिळ पंतप्रधान झाला तर त्याने सर्वकाही तामिळाला घेऊन जायचे अशा शब्दात राज ठाकरे यांनी मोदींना टोला लगावला.

माझी 2014 ची भाषणे काढून पहा, मी त्यावेळीच सांगितलं होत की, मोदी पंतप्रधान झाले तर त्यांनी उत्तरप्रदेश, बिहार झारखंड या राज्यांकडे लक्ष द्यावे. जेणेकरून या राज्यांचा विकास होईल असे मत यावेळी राज ठाकरेंनी व्यक्त केले. तसेच 2019 च्या निवडणुकांवर बोलताना ते म्हणाले, जर कोणी चांगलं काम केले तर त्याचे अभिनंदन करावे इतका मोठे पणा आपल्यामध्ये असावा.

2019 नंतर काश्मीरमधील 370 कलम हटवला गेला, रामजन्म भूमी विषय मार्गी लागणे यासारख्या अनेक चांगल्या गोष्टी सरकारकडून झाल्या. याबद्दल सरकारचे अभिनंदन मी केले. आपल्याकडे विरोध करायचा म्हणून विरोध केला जातो. मात्र चांगल्या गोष्टींचे कौतुक केले पाहिजे अशा शब्दात राज ठाकरे यांनी दुसरीकडे मोदी सरकारचे कौतुक देखील केले.

Tags

follow us