मोठी बातमी; राज ठाकरे यांनी अदानी यांच्या विरोधातील व्हिडिओ हटवला; म्हणाले, ‘हेतू साध्य झाला’

Raj Thackeray Deletes Adani Modi Documentary; अदानी-मोदी संबंधांवर प्रश्न उपस्थित करणारी डॉक्युमेंट्री राज ठाकरेंनी एक्स अकाऊंटवरून हटवली.

Raj Thackeray Deletes Adani Modi Documentary

Raj Thackeray Deletes Adani Modi Documentary

Raj Thackeray Deletes Adani Modi Documentary: गौतम अदानी (Gautam Adani) आणि नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या संबंधांवर प्रश्न उपस्थित करणारी फ्रेडशीप फाईल्स (Friendship Files) ही डॉक्युमेंट्री राज ठाकरेंनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून हटवली आहे. सबीर भाटिया यांची ही अदानी समूहावरील डॉक्युमेंट्री सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तिला मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा करत, मुंबई पोलीस आयुक्तांच्या विनंतीचा मान राखून ही पोस्ट डिलीट करत असल्याचं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं. मात्र, एकाधिकारशाहीविरोधातील आपला लढा सुरूच राहणार असल्याचं सांगत त्यांनी जानेवारी 2026 मध्ये शिवतीर्थावर केलेल्या प्रेझेंटेशनचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला आहे. राज ठाकरेंनी पोस्ट करुन याबद्दल माहिती दिली.

“त्या फायनान्स कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा”; नांदेडच्या शेतकरी मृत्यू प्रकरणी सतेज पाटील आक्रमक

राज ठाकरेंची पोस्ट

गौतम अदानी आणि नरेंद्र मोदी यांचा दोस्ताना कसा जुना आहे, आणि यातून अदानींच्या घशात भारतीय उद्योग विश्व कसं घातलं जात आहे याची पूर्ण माहिती देणारी सबीर भाटिया यांची डॉक्युमेंट्री मी माझ्या सोशल मीडियावर शेअर केली. त्याला 48 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज फक्त ट्विटरवर मिळाले, फेसबुकवर देखील प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. हे झाले माझ्या सोशल मीडियावरचे व्ह्यूज, बाकी लोकांनी शेअर केलं ते वेगळं आणि त्यातून मिळालेले व्ह्यूज याची मोजदादच नाही.

थोडक्यात हा गंभीर विषय लोकांपर्यंत पोहचला पाहिजे ही माझी इच्छा होती, तो हेतू साध्य झाला. अर्थात सबीर भाटियांनी ही डॉक्युमेंट्री आत्ता बनवली. पण त्याच्या आधीच जानेवारी 2026 ला मुंबईतील शिवतिर्थ येथून मी एक मोठं प्रेझेंटेशन केलं होतं, ज्यात अदानीं समूह शब्दशः हा देश कसा गिळंकृत करायला निघाला आहे हे दाखवलं होतं.
त्याला अद्वितीय असा प्रतिसाद मिळाला. ते व्हिडीओज आजही माझ्या सोशल मीडियावर आहेत. आम्ही जे सादरीकरण केलं त्यातल्याच काही क्लिप्स या डॉक्युमेंट्रीत पण वापरल्या गेल्या. असो.

या विषयाच्या बाबत मी माझी भूमिका या आधी अनेकदा स्पष्ट केली आहे. माझा व्यक्तीला विरोध नाही तर एकाधिकारशाहीला विरोध आहे. मी माझ्या भाषणातून अनेकवेळा सांगितलं की पंतप्रधानांनी देशातील अनेक उद्योगपती मोठे करावेत आणि ज्यातून प्रचंड रोजगार या देशात निर्माण करावा आणि प्रचंड पैसा या देशात निर्माण व्हावा! तसेच या देशातील अनेक उद्योगपतींना जग पादाक्रांत करण्याची शक्ती द्यावी.

पण ते सोडून जर एकाचेच लाड करणार असाल आणि त्याने देशाला धोका निर्माण होणार असेल तर आमचा त्याला विरोध आहे आणि यापुढेही राहील. त्यामुळे अदानीच काय कोणाच्याही एकाधिकारशाहीला विरोध असणारच आहे.

 

आत्ता देखील आपल्या भीमाशंकर येथील काहीशे हेक्टर वनजमीन गुजरात मधल्या टोरेंट कंपनीच्या घशात घालायला राज्य सरकारला केंद्र सरकारने सांगितलं आहे. महाराष्ट्रातल्या अनेक वनजमिनी या सरकारने ठरावीक मित्र मंडळी उद्योगपतींच्या घशात घातल्या आहेत आणि अजुन घालायच्या ठरवल्या आहेत ! आज कोण कुठच्या पक्षात आहे याच्याशी मला काही देणे घेणं नाही, परंतु आपण या महाराष्ट्राचे नागरिक आहोत आणि आपल्या डोळ्यांदेखत महाराष्ट्र विकला जातोय हे बघताना तुमची तळपायाची आग मस्तकात कशी जात नाही याचंच मला आश्चर्य वाटतं ! महाराष्ट्रातल्या आपल्या मराठी खासदारांना , आमदारांना, मंत्र्यांना हे आपल्या डोळ्यांसमोर घडतंय याचा राग सुद्धा येत नाही ? सत्तेसमोर इतकं शरण जाणं हे महाराष्ट्राच्या इतिहासाला, परंपरेला आणि संस्कृतीला शोभणारे नाही. कशाला मग आपल्या शिवछत्रपतींच्या घोषणा देता आणि महाराष्ट्र गीत गाण्याचा फार्स करता ? असो..

पण सबीर भाटिया यांची डॉक्युमेंट्री शेअर केल्यावर तिला इतका प्रचंड प्रतिसाद आला की, वरच्यांच्या पोटात गोळा उत्पन्न होणे आणि आपलं गुपित फुटलं याची भीती निर्माण होणं हे स्वाभाविक होतं. पण ती इतकी तीव्र असावी की मला मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या मार्फत ही डॉक्युमेंट्री काढावी अशी विनंती केली गेली असावी.

मुळात मला जे म्हणायचं होतं ते जानेवारी 2026 च्या सभेत आणि पुन्हा या डॉक्युमेंट्रीला पोस्ट करण्याच्या निमित्ताने केलं गेलं; यातून देशाचं प्रबोधन होणं हाच उद्देश होता आणि आहे ! पण मला आलेली विनंती ही मुंबई पोलीस आयुक्तांची आहे. मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वात कार्यक्षम पोलीस दल आहे आणि माझ्या मनात नेहमीच त्यांच्याबद्दल आदर राहिला आहे. अशा मुंबई पोलिसांच्या प्रमुखाने केलेल्या विनंतीचा मान राखतोय इतकंच.

म्हणून ही डॉक्युमेंट्रीची पोस्ट मी डिलीट करतोय. बाकी जी आग लागायची ती लागली आहे. जानेवारी 2026 ला शिवतीर्थावरून मी या देशातील एकाधिकारशाहीच्या विरोधात ठिणगी टाकली तिचा वणवा पेटला आहे. आमचा लढा सुरु आहे. जानेवारी 2026 ची आमची पोस्ट अजून तिथेच आहे आणि तिथेच राहील.आम्ही शेअर केलेली डॉक्युमेंट्री दुसऱ्यांनी बनवली होती ती पण लोकांपर्यंत पोहचावी हा उद्देश होता जो साध्य झाला. या विषयावर आम्ही केलेली अभ्यासपूर्ण मांडणी ही या निमित्ताने पुन्हा समोर आणतोय. आमच्या जानेवारी 2026 च्या प्रेझेंटेशनचा भाग परत इथे देतोय. परत एकदा नक्की बघा..

कर्जवसुलीसाठी छळ? नांदेडच्या फायनान्स कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्याचा गळफास घेतलेला मृतदेह आढळल्याने खळबळ

दरम्यान, सबीर भाटिया यांची डॉक्युमेंट्री डिलीट करण्याचा निर्णय घेतला असला, तरी अदानी समूहाच्या कथित एकाधिकारशाहीविरोधातील आपली भूमिका बदललेली नाही, असा स्पष्ट संदेश राज ठाकरे यांनी दिला आहे. जानेवारी 2026 मध्ये शिवतीर्थावर केलेलं प्रेझेंटेशन पुन्हा समोर आणत, या विषयावर जनजागृती करण्याचा आपला प्रयत्न सुरूच राहील, असं त्यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version