कर्जवसुलीसाठी छळ? नांदेडच्या फायनान्स कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्याचा गळफास घेतलेला मृतदेह आढळल्याने खळबळ

Nanded Farmer Death: नांदेडमध्ये खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात कर्ज घेतलेल्या 40 वर्षीय शेतकऱ्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.

Nanded Farmer Death Due to Loan Recovery Harassment

Nanded Farmer Death Due to Loan Recovery Harassment: नांदेडमध्ये खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात कर्ज घेतलेल्या 40 वर्षीय शेतकऱ्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. चंद्रकांत शिंदे (Chandrakant Shinde) असं मृत शेतकऱ्याचं नाव असून, माळकौठा (ता. मुदखेड) हे त्यांचं गाव आहे. शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना समोर आली. मात्र, चंद्रकांत यांनी आत्महत्या केली नसून त्यांची हत्या करून आत्महत्येचा बनाव रचल्याचा संशय त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. कर्जवसुलीसाठी त्यांना कार्यालयात डांबून ठेवून छळ करण्यात आल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे.

‘काँग्रेसचे 75, मविआचे 160 आमदार निवडून येणार होते, ‘इंटेलिजन्स ब्युरो’ने दिला होता अहवाल’; नाना पटोलेंचा खळबळजनक दावा

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत शिंदे यांनी एका खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतलं होतं. या कर्जाच्या वसुलीसाठी त्यांना फायनान्स कंपनीच्या माणसांनी बुधवारी गावातून कंपनीच्या कार्यालयात आणण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर शनिवारी त्यांचा मृतदेह याच कार्यालयात आढळला. विशेष म्हणजे, सायंकाळपर्यंत मृतदेह कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

चंद्रकांत यांच्या आई सर्जाबाई यांनी पैशांच्या व्यवहारावरून मुलाची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, अवघ्या 7 हजार रुपयांच्या व्यवहारावरून संशयितांकडून 1 लाख 50 हजार रुपयांची मागणी केली जात होती. पैशांसाठी फोनवरून वारंवार दबाव टाकला जात होता. तसंच, गेल्या दोन दिवसांपासून मुलाला ताब्यात ठेवून त्याचा छळ केल्याचा आरोपही त्यांनी केला. संशयितांनीच मुलाची हत्या करून ती आत्महत्या असल्याचं भासवलं, असा दावा सर्जाबाई यांनी केला आहे.

तुकाराम मुंढेंच्या FDA ची केंद्राविरोधात हायकोर्टात धाव; अधिकार हिरावल्याचा गंभीर आरोप

मृत शेतकऱ्याची मुलगी रुपाली हिनेही कर्जवसुलीच्या पद्धतीवर संताप व्यक्त केला. चंद्रकांत यांनी काही दिवसांपूर्वी खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतलं होतं. कर्जाची परतफेड केल्यानंतरही कंपनीकडून पैशांची मागणी सुरू असल्याचा आरोप तिने केला आहे. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.

दरम्यान, या घटनेची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांची तक्रार स्वीकारली आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल. त्यानंतर उपलब्ध पुरावे आणि तपासाच्या निष्कर्षांनुसार पुढील कारवाई केली जाईल.

IND vs NZ : तिलक-नितीशने न्यूझीलंडच्या जबड्यातून विजय खेचून आणला; अखेरच्या षटकात थरार !

खासगी फायनान्स कंपन्यांकडून कर्जवसुलीच्या नावाखाली सर्वसामान्यांना त्रास दिला जात असल्याचा मुद्दाही या घटनेनंतर चर्चेत आला आहे. मात्र, चंद्रकांत शिंदे यांच्या मृत्यूमागे नेमकं कारण काय? हे पोलीस तपास आणि शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.

follow us