IND vs NZ : तिलक-नितीशने न्यूझीलंडच्या जबड्यातून विजय खेचून आणला; अखेरच्या षटकात थरार !
IND vs NZ 2nd T20I- हा भारताचा टी-20 मधील 300 सामना होता. त्यात हा सामना जिंकून भारताने दोनशे सामने जिंकण्याचा विक्रम नोंदविला आहे.
IND vs NZ 2nd T20I : भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना जबरदस्त झाला. भारताने दुसऱ्या सामन्यात ४ विकेट्सने शानदार विजय मिळवला. एकवेळ भारतीय संघ पराभवाच्या छायेत होता. मात्र, तिलक वर्मा (Tilak Varma) आणि नीतीशकुमार रेड्डी (Nitish Kumar Reddy) यांनी स्फोटक फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. अखेरच्या षटकात टीम इंडियाने सामना आपल्या नावावर केला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतलीय. हा भारताचा टी-20 मधील 300 सामना होता.
प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने पाच विकेट्सच्या मोबदल्यात 180 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाला अखेरच्या पाच षटकांत विजयासाठी 68 धावांची गरज होती. त्यावेळी भारताचे सहा फलंदाज माघारी परतले होते. न्यूझीलंडचे गोलंदाज सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवत असताना तिलक वर्मा आणि नीतीश रेड्डी यांनी आक्रमक फलंदाजी करत सामन्याचे चित्रच पालटले.
तिलक वर्माची नाबाद अर्धशतकी खेळी
तिलक वर्माने अखेरच्या षटकांमध्ये आक्रमक फलंदाजी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. 17 व्या षटकानंतर तो 13 चेंडूंत 17 धावा करून खेळत होता. मात्र, त्यानंतर त्याने वेगाने धावा जमवत न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण केला. 19व्या षटकात नॅथन स्मिथच्या गोलंदाजीवर तिलकने तीन चौकार आणि एक षटकार लगावत 18 धावा कुटल्या. त्यामुळे अखेरच्या षटकात भारताला विजयासाठी 11 धावांची गरज होती. तिलकने पाचव्या चेंडूवर भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तिलक वर्माने अवघ्या 26 चेंडूंत सहा चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने नाबाद 51 धावा केल्या. दुसरीकडे, नीतीशकुमार रेड्डीने केवळ 13 चेंडूंत 26 धावांची आक्रमक खेळी केली. या दोघांनी अवघ्या 30 चेंडूंत नाबाद 69 धावांची भागीदारी करत भारताला संस्मरणीय विजय मिळवून दिला.
नमन धीर पुन्हा चमकला
मोठ्या धावसंख्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. संजू सॅमसनने पहिल्या षटकात एकही धाव घेतली नाही. त्यानंतर तो 17 चेंडूंत 14 धावा करून बाद झाला. वैभव सूर्यवंशीला आठ चेंडूंत केवळ चार धावा करता आल्या, तर अभिषेक शर्माने 27 धावांचे योगदान दिले. कर्णधार श्रेयस अय्यरला सात धावांमध्ये बाद झाला. अक्षर पटेलही 11 धावा करून माघारी परतला. त्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला होता. मात्र, मधल्या फळीतील फलंदाजांनी संघर्ष सुरू ठेवला. नमन धीरनेही महत्त्वपूर्ण योगदान देत विजयाच्या आशा कायम ठेवल्या. त्याने 17 चेंडूत 31 धावा केल्या. त्यात तीन षटकार आणि एक चौकाराचा समावेश आहे. त्यानंतर तिलक वर्मा आणि नीतीशकुमार रेड्डी यांनी आक्रमक फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला.
खराब सुरुवातीनंतर न्यूझीलंडची दमदार फलंदाजी
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडची सुरुवातही खराब झाली. टीम सेफर्टला अवघ्या सात धावांवर अर्शदीप सिंगने बाद केले. त्यानंतर भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर डॅरिल मिचेलने तिलक वर्माकडे झेल देऊन बाद झाला. तर फिन अॅलनला प्रिन्स यादवने त्रिफळाचीत केले. अॅलनला केवळ 16 धावा करता आल्या. एका टप्प्यावर न्यूझीलंडची अवस्था 41 धावांत तीन विकेट्स अशी झाली होती. मात्र, ग्लेन फिलिप्स आणि बेव्हन जेकब्स यांनी चौथ्या विकेटसाठी 76 चेंडूंत 116 धावांची दमदार भागीदारी करत संघाला सावरले. जेकब्सने 46 चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 58 धावा केल्या. तर ग्लेन फिलिप्सने अवघ्या 43 चेंडूंत चार चौकार आणि चार षटकारांसह 70 धावांची आक्रमक खेळी केली. मिचेल सँटनर चार धावांवर, तर मायकेल ब्रेसवेल दोन चेंडूंत 10 धावा करून नाबाद राहिला. या फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने १८० धावांपर्यंत मजल मारली.
भुवनेश्वर कुमार महागडा, अर्शदीप सिंहची प्रभावी गोलंदाजी
भारतीय गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमार महागडा ठरला. त्याने चार षटकांत 50 धावा देत केवळ एक विकेट मिळवली. अर्शदीप सिंह हा भारताचा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 33 धावा देत दोन विकेट्स घेतल्या. अक्षर पटेलने चार षटकांत केवळ 28 धावा देत किफायतशीर गोलंदाजी केली. नीतीश कुमार रेड्डी आणि प्रिन्स यादव यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवली.