Download App

सोहळा संध्याकाळी का नाही ठेवला? राज ठाकरे प्रशासनावर संतापले

Raj thackeray Speech On Heat Stroke : नवी मुंबईतील खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्याला हजेरी लावलेल्या अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला व यातच उष्माघाताने आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. आता यावरून राजकारण पेटले असून नुकतेच राज ठाकरे यांनी रुग्णालयात जात श्रीसदस्यांची विचारपूस केली आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उष्माघातामुळे झालेल्या श्रीसदस्यांच्या मृत्यूवरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. इतक्या कडाक्याच्या उन्हात हा कार्यक्रम न करता त्याची वेळ संध्याकाळची असावी हे प्रशासनाला कळलं नाही का? असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यानंतर अनेकांना उष्माघाताचा त्रास जाणवू लागला. अनेकांनां तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान उष्मघातामुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण अस्वस्थ झाले आहे. यातच या रुग्णांच्या भेटीसाठी राजकीय नेत्यांनी रुग्णालयात धाव घेतली. मुख्यमंत्री शिंदे यांच्यापाठोपाठ उद्धव ठाकरे व अजित पवार यांनी देखील संबंधितांची भेट घेत विचारपूस केली.

दरम्यान घटनेचे गांभीर्य ओळखून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील आज रुग्णालयात आज रुग्णांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राज्य सरकारवर जोरदार टीका केली. तसेच राज ठाकरे यांनी ट्विटद्वारे प्रशासनावर निशाणा साधला आहे.

राज ठाकरे यांचे ट्विट
काल ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान झाला. ही अतिशय आनंदाची बाब आहे. हा पुरस्कार जेव्हा घोषित झाला तेव्हा मी आप्पासाहेबांचं आणि सरकारचं अभिनंदन केलं होतं. पण ह्या सोहळ्याला जे गालबोट लागलं ते टाळता आलं नसतं का?

कधी नव्हे ते मुंबईत सुद्धा उष्माघाताच्या बातम्या वाचायला मिळत असताना, इतक्या कडाक्याच्या उन्हात हा कार्यक्रम न करता त्याची वेळ संध्याकाळची असावी हे प्रशासनाला कळलं नाही का? सरकारने जरी मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केली असली तरी इतक्यावर न थांबता अशा दुर्दैवी घटना पुन्हा होणार नाहीत आणि प्रशासन अशा चुका करणार नाही ह्याची काळजी घ्यावी. ह्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे.

Tags

follow us