नाशिक : माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsinh Koshyari) यांचा राजीनामा राष्ट्रपती (President) द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी मंजूर केला आहे. त्यामुळे उशिरा का होईना, सरकारला सुचलेले शहाणपण आहे. पण राज्यपाल कसा नसावा हे भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाहिले की लक्षात येते. नवीन येणारे राज्यपाल (Governer) रमेश बैस (Ramesh Bais) यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्या चुका लक्षात ठेवाव्यात. तसेच त्या चुकांचा अभ्यास करून कारभार करावा. राज्यपाल हे घटनात्मक पद असल्याने आम्हाला मर्यादा येतात. पण महापुरुषांच्या जर कोणी अवमान केला तर ‘जो चुकेल त्याला ठोकणार, असा पवित्रा येणाऱ्या काळात स्वराज्य संघटना घेणार आहे, असे म्हणत स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांनी नवे राज्यपाल रमेश बैस यांनाच एकप्रकारे इशारा दिला आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह देशातील वेगवेगळ्या १३ राज्यांच्या राज्यपालांच्या बदलीचे आदेश रविवारी (दि. १२) रोजी काढले. त्यात महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला. त्यावर संभाजीराजे छत्रपती बोलत होते. संभाजीराजे म्हणाले की, माजी राज्यपाल कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या सुसंस्कृत पणाची घडी पार विस्कटून टाकली. राज्यपाल कसा नसावा, असे त्यांच्या आचार, विचारातून समजून येते. त्यामुळे नवीन येणारे राज्यपाल रमेश बैस यांना आम्ही शुभेच्छा देतो. पण रमेश बैस यांनी कोश्यारी यांच्या चुका आधी लक्षात घ्याव्यात. त्या चुका आपल्याकडून होणार नाही. याची दक्षता घेऊन त्यांनी कामकाज केले पाहिजे. तसेच महाराष्ट्र हे वेगळे राज्य, वेगळा इतिहास आहे. महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा, इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे काम नवीन राज्यपालांनी करायला हवे.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, कोणत्याही प्रकारचे काम असल्यास राज्यपाल यांची भेट घेण्यास हरकत नाही. पण राज्यपाल यांनी पक्षाच्या पलिकडे जाऊन वागावे. ते सर्वांचे असतात. कोणत्याही एका पक्षाचे ते नसतात. या महाराष्ट्रात महापुरुषांबाबत परत कोणी जर अवमानकारक वक्तव्य केले तर स्वराज्य संघटना गप्प बसणार नाही. यापुढे ‘जो चुकेल त्याला ठोकणार’ अशा प्रकारे इशाराच संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे.