Ramgiri Maharaj : नाशिकमधील एका गावात प्रवचनाच्या दरम्यान सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) यांनी एका धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेचे नाशिकसह, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) पडसाद उमटले. त्यानंतर रामगिरी महाराजांवर येवला शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, यावर आता महंत रामगिरी महाराजांनी प्रतिक्रिया दिली.
महंत रामगिरी महाराज म्हणाले की, एकशे सत्ताहत्तर वर्षांपूर्वी या सप्ताहाला सुरुवात झाली होती. 20 ते 25 लाख लोक येथे येतात. अखंड भजनात तल्लीन होतात. लोकांना भक्तिमार्गावर आणण्याचे काम आम्ही या सप्ताहाच्या माध्यमातून करतो. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. बांगलादेशात एका महिलवर 30 जणांनी बलात्कार केला. सीमेवर एक ते दीड कोटी लोक उभे आहेत. भारतात प्रवेश मागत आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना आम्ही सांगितले की, हिंदूंनी मजबूत राहिले पाहिजे. बांगलादेशात जे घडलं ते उद्या आपल्या इथे घडायला नको.. अन्याय करणारा जसा अपराधी असतो, तसा सहन करणाराही दोषी असतो. म्हणूनच आपण अन्यायाचा प्रतिकार केला पाहिजे.
नाना पटोले यांनी भाजपाचा मोहरा फोडला; विदर्भात भाजपला गळती
पुढं ते म्हणाले, आमचा त्यामागचा उद्देश एकच होता की, हिंदूंनी संघटित राहावे. आम्ही जे वक्तव्य केलं, त्याच्या परिणामांना सामोरे जाण्याची आमची तयारी आहे. आमच्यावर गुन्हा दाखल झाला असेल तर नोटीस येईल तेव्हा बघू. आता सप्ताह सुरू आहे. आम्ही हा सप्ताह झाल्यानंतर पुढे बघू, असं महंत रामगिरी महाराज म्हणाले.
वैजापूरमध्ये जमावबंदी…
महंत रामगिरी महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील आंबेडकर चौकात रात्री अचानक मोठा जमाव जमला होता. त्यांनी घोषणाबाजी करत टायरही जाळले. याप्रकरणी वैजापूर पोलिसांनी रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल केल्यानंतर जमाव शांत झाला. या पार्श्वभूमीवर वैजापूर तालुक्यात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. 16 ऑगस्टच्या मध्यरात्री 12 वाजेपासून ते 19 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे आदेश दिले.
इम्तियाज जलील आक्रमक
तर दुसरीकडे संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलीलने (Imtiaz Jaleel) देखील या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत रामगिरी महाराज यांच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन केले तसेच रामगिरी महाराजाला लवकरात लवकर अटक करा, अशी मागणी केली.