वन विभागातील महिला कर्मचारी गिरीश महाजनांवर भडकली; बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्याने विचारला जाब

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न झाल्याने एका महिला कर्मचाऱ्याने थेट व्यासपीठासमोर उभं राहून मंत्र्यांना जाब विचारला.

  • Written By: Published:
WhatsApp Image 2026 01 26 At 2.34.01 PM

Female forest department employee lashes out at Girish Mahajan : देशभरात आज 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सकाळपासूनच विविध जिल्ह्यांमध्ये मंत्री, पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचे कार्यक्रम पार पडले. मात्र, नाशिकमध्ये आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात एक अनपेक्षित घटना घडल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. नाशिकमधील कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन भाषण करत असताना अचानक गोंधळ उडाला. भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न झाल्याने एका महिला कर्मचाऱ्याने थेट व्यासपीठासमोर उभं राहून मंत्र्यांना जाब विचारला. या घटनेमुळे उपस्थितांमध्ये खळबळ उडाली.

जाब विचारणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचे नाव माधवी जाधव असून त्या वन विभागात कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी आवाज उठवताच पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत त्यांना ताब्यात घेतले. यानंतर आपली भूमिका स्पष्ट करताना माधवी जाधव म्हणाल्या की, ‘संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात न घेणे ही गंभीर बाब आहे. त्यांनी देशाला संविधान दिलं, लोकशाहीचा पाया घातला. अशा व्यक्तीचं नाव वगळणं चुकीचं आहे. मला निलंबित केलं तरी चालेल, पण मी माफी मागणार नाही.’

महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजपकडून सन्मान; कोश्यारींच्या पद्मभूषण पुरस्कारावरून राऊत संतापले

त्या पुढे म्हणाल्या, ‘माझ्यावर कोणतंही काम सोपवा, वाळू उतरवणं असो किंवा मातीचं काम, मी ते करायला तयार आहे. मात्र बाबासाहेबांची ओळख पुसली जाऊ देणार नाही. मंत्र्यांनी आपली चूक मान्य करावी,’ असा ठाम सूर त्यांनी व्यक्त केला. आपली नाराजी व्यक्त करताना माधवी जाधव यांनी सांगितलं की, ‘भाषणात बाबासाहेबांचं नाव येईल, याची मी शेवटपर्यंत वाट पाहत होते. पण लोकशाही आणि संविधानाशी थेट संबंध नसलेल्या व्यक्तींची नावं वारंवार घेतली गेली. मग प्रजासत्ताक दिनाचा खरा मानकरी असलेल्या बाबासाहेबांचा उल्लेख का झाला नाही?’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी माधवी जाधव यांना ताब्यात घेतलं असून, या प्रकारामुळे नाशिकमधील प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम चर्चेचा विषय ठरला आहे.

follow us