मुंबई – महाराष्ट्राच्या राज्यपालपदी रमेश बैस (Ramesh Bais) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधीचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केल्यानंतर त्यांच्या जागी बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी कोश्यारी वादग्रस्त ठरले होते. कोश्यारी यांनी त्यांच्या कार्यकाळात नेहमीच सत्ताधारी भाजपला (BJP) पूरक भूमिका घेतल्याचा विरोधकांचा आरोप होता. महापुरुषांबद्दल त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यात वादंग उठले होते. विरोधी पक्षांनी आंदोलने करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या पार्श्वभुमीवर त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. यानंतर आता रमेश बैस राज्याचे राज्यपालपदी विराजमान झाले आहेत. रमेश बैस याआधी झारखंडचे (Jharkhadnd) राज्यपाल होते. तेथेही राज्य सरकार आणि बैस यांच्यात मतभेद होते. त्यामुळे आता त्यांच्या कार्यकाळात तसाच संघर्ष राज्यात पहायला मिळणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
रमेश बैस यांचा जन्म छत्तीसगड (Chhattisgarh) राज्यातील रायपूर येथे झाला आहे. तब्बल सात वेळा खासदार म्हणून निवडून आलेले बैस हे देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. मात्र २०१९ मध्ये त्यांना लोकसभेचं तिकीट नाकारण्यात आले. त्यानंतर त्रिपुरा राज्याचे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांना नियुक्त करण्यात आले होते. त्रिपुरात (Tripura) दोन वर्ष राज्यपाल म्हणून काम पाहिल्यानंतर २०२१ मध्ये त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर आता महाराष्ट्राचे राज्यपालपद रिक्त झाल्यानंतर त्यांच्याकडे ही धुरा सोपवण्यात आली आहे. याआधी बैस झारखंडचे राज्यपाल होते. तेथेही त्यांचे आणि राज्य सरकारमध्ये मतभेद निर्माण झाले होते. कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) आणि राज्यपाल बैस यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. त्यानंतर आता त्यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बैस यांच्यासमोर सत्ताधारी आणि विरोधकांना सोबत घेत राज्य कारभार सुरळीत करण्याचे आव्हान असणार आहे.
याआधी तत्कालीन राज्यपाल कोश्यारी यांची कारकिर्द वादळी ठरली होती. त्यांच्या वक्तव्यावरून अनेकदा वादळ उठले होते. त्यामुळे भाजपचीही कोंडी झाली होती. याच दरम्यान त्यांनी एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हापासूनच राज्याच्या राज्यपालपदाची जबाबदारी दुसऱ्याकडे दिली जाणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यानुसार अपेक्षित निर्णय घेण्यात आला आहे.
कोण आहेत नवे राज्यपाल बैस ?
महाराष्ट्र नवे आलेले राज्यपाल रमेश बैस झारखंडचे राज्यपाल होते. तेथे ते झारखंड मुक्ति मोर्चाच्या हेमंत सोरेन सरकारला सतत धारेवर धरण्यासाठी ओळखले जात. ५० वर्षे भाजपासोबत राजकारण करणारे बैस झारखंडमधील दीड वर्षाच्या कारकीर्दीत सतत संघर्षरत होते. आता महाराष्ट्रात ‘सध्या तरी’ काहीसे निवांत असतील, पण आमदार नियुक्ती वगैरे मुद्द्यांवर ते पुढे जाऊ शकतील. तसंच न्यायालयीन निकालानंतर काही बदल झाला, तर ‘भाजपा’ राजकारणाचा त्यांचा अर्धशतकी अनुभव उपयोगी ठरू शकेल.