Ravindra Dhangekar Allegation On BJP Nilesh Ghaywal Pune Crime : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याने राज्यातील पोलीस यंत्रणेला चकवा देत लंडनला पलायन केल्याच्या प्रकरणाचे पडसाद राजकीय पातळीवर उमटताना दिसत आहेत. घायवळवर गंभीर गुन्ह्यांचे डोंगर असूनही त्याला पासपोर्ट कसा मिळाला, यामागे कोणाचा हात आहे, यावर सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. या संपूर्ण प्रकारात काही वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि प्रभावी राजकीय नेत्यांचा सहभाग असल्याचा संशय अधिकच गडद होत आहे.
याच पार्श्वभूमीवर शिंदे गटातील पुण्यातील आघाडीचे नेते रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी थेट भाजप नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर सवाल उपस्थित केला आहे. निलेश घायवळसारख्या ((Nilesh Ghaywal) गुन्हेगाराने देश सोडून लंडन गाठलं, तरी चंद्रकांत पाटील गप्प का आहेत? असा थेट प्रश्न धंगेकरांनी केला आहे. धंगेकरांच्या या वक्तव्यामुळे महायुतीत अंतर्गत वाद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एका बाजूला घायवळसारख्या गुन्हेगाराचा लंडनपर्यंतचा प्रवास पोलिसांच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे, तर दुसऱ्या बाजूला या प्रकरणात भाजप नेत्यांना ओढल्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
निलेश घायवळ प्रकरणात चंद्रकांत पाटील का बोलत नाहीत? ते गप्प का आहेत? त्यांनी या प्रकरणात लक्ष का घातलं नाही? असे प्रश्न शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रविंद्र धंगेकर यांनी उपस्थित केले आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले की, घायवळ याला वरदहस्त आहे, त्याशिवाय त्याला पासपोर्ट कसा मिळतो? पोलिसांची चौकशी व्हायला हवी. मग घायवळला कोण मदत करतंय हे समोर येईल. मी सत्तेत असलो तरी खोट्याला खोटं म्हणणार आहे. पुणेकरांचे प्रश्न मांडणार आहे.
आपण सध्या देशातील परिस्थिती बघितली, तर सगळी परिस्थिती खूप खराब आहे. प्रत्येक शहरात, जिल्ह्यात, राज्यात तरूण रस्त्यावर येत आहे. पुणे शहरात मागील आठवड्यात घायवळ टोळीच्या लोकांनी एका माणसाला मारहाण केली. जीवे मारण्यापर्यंत वार केले, रिव्हॉल्वर दाखवत हल्ला केला. अहिल्यानगर, पुणे शहर या भागात त्यांचं दहशतीचं वातावरण आहे. निवडणुकीत या घायवळने अनेक लोकांना मदत केल्याचं आपण समोरून पाहिलं आहे. त्यांचे फोटोही समोर आलेले आहेत.
जर सत्ताधारी लोकं गुन्हेगारांना पाठीशी घालत असतील, तर गुन्हेगार कोणत्याही थराला जावून पोलिसांना आव्हान देऊ शकतो. याचंच उदाहरण निलेश घायवळ आहे. ज्यानी एवढा मोठा गुन्हा करून आज भारत सोडून पळून गेलेला आहे. सगळ्यात जास्त म्हणजे महाराष्ट्रातील पोलिसांची नाचक्की आणि गृहखात्याची सुद्धा नाचक्की आहे. पुण्यात गुन्हेगारीचा चेहरा मानल्या जाणाऱ्या निलेश घायवळच्या पलायनामुळे केवळ कायदा-सुव्यवस्था धोक्यात आली नसून, सत्ताधारी पक्षांच्या गोटातही मतभेद उफाळून येण्याची चिन्हे दिसत आहेत. येत्या काही दिवसांत या प्रकरणाचा राजकीय वादळात अधिकच विस्तार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.