Kalyan Dombivli Municipal Corporation Election : राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मात्र त्यापूर्वीच कल्याण डोंबिवली महापालिकेतून भाजपसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेतील प्रभाग क्रमांक 18 अ मध्ये भाजपच्या उमेदवार रेखा चौधरी यांची जवळपास बिनविरोध निवड होणार आहे.
प्रभाग क्रमांक 18 अ मागास प्रवर्ग महिलासाठी आरक्षित होते मात्र या जागेवर 30 डिसेंबरपर्यंत फक्त रेखा चौधरी यांचाच अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड होणार आहे. आज 31 डिसेंबर रोजी राज्य निवडणूक आयोग त्यांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी करत त्यांना विजय घोषित करण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत निकालाआधीच भाजपने आपले विजयाचे खाते उघडले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे.
रेखा चौधरी यांचा एकच अर्ज दाखल
कल्याण डोंबिवली महापालिका (Kalyan Dombivli Municipal Corporation Election) प्रभाग क्रमांक 18 अ मागास प्रवर्ग महिलासाठी आरक्षित होता. या जागेसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीपर्यंत फक्त भाजपच्या (BJP) उमेदवार रेखा चौधरी (Rekha Chaudhary) यांचा एकच अर्ज दाखल झाला असल्याची माहिती निवडणूक अधिकारी वरुण कुमार यांनी दिली आहे. त्यामुळे भाजपने महापालिका निवडणुकीत विजयाचे खाते उघडले आहे. तर दुसरीकडे ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी विशेष प्रयत्न केले असल्याची माहिती देखील समोर येत आहे.
माहितीनुसार, रेखा चौधरी या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्या आहेत. रेखा चौधरी यांचा विजय हा हिंदुत्वाचा पहिला विजय असल्याची प्रतिक्रिया भाजपकडून देण्यात आली आहे. याचबरोबर रेखा चौधरी या भाजपच्या कल्याण विभागाच्या महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष देखील आहेत.
आज ‘या’ राशींना होणार आर्थिक फायदा; जाणून घ्या सर्व राशींसाठी वर्षाचा शेवटचा दिवस कसा असेल ?
राज्यातील 29 महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची मुदत संपली असून आता उमेदवारांना 2 जानेवारीपर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. राज्यातील अनेक महापालिका निवडणुकीत काँग्रेस, भाजप, दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत असल्याने कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
