जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात (Election) एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिकमधील महायुतीतील बंडखोरीचा तिढा यशस्वीपणे सोडवल्यानंतर नाशिकपाठोपाठ जळगावचाही पेच सुटला आहे. आता केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे, असा दावा भाजप नेते गिरीश महाजन यांनी केला होता. मात्र, या दाव्यानंतर काही तासांतच शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे अचानक नॉट रिचेबल झाल्याची माहिती समोर आली आहे.
रेश्मा काळे या आज सकाळपासूनच कोणाच्याही संपर्कात नाहीत. त्यांच्या जळगाव येथील राहत्या निवासस्थानी सध्या शुकशुकाट पाहायला मिळत आहे. त्या घरी उपस्थित नाहीत असे बोललं जात आहे. तसेच, त्यांचे सर्व मोबाईल फोनही बंद येत आहेत. नाशिकमधील बंडखोरी शमल्यानंतर जळगावातून रेश्मा काळे आपली उमेदवारी मागे घेतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, अंतिम टप्प्यात त्या नॉट रिचेबल झाल्यामुळे जळगावमधील बंडखोरीचा पेच कायम असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.
नाशिक विधान परिषदेतून गोकुळ गीतेंनी शेवटच्या क्षणी शस्त्र म्यान का केलं? वाचा पडद्यामागची स्टोरी
रेश्मा काळे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यापासूनच आपली भूमिका आक्रमक ठेवली होती. नाशिकमधील गुंतागुंतीमुळे आपल्याला जळगावातून उमेदवारी अर्ज भरावा लागला. जर नाशिकच्या बंडखोरांनी माघार घेतली, तर आपणही विचार करू, असे संकेत त्यांनी सुरुवातीला दिले होते. मात्र, काल माध्यमांशी बोलताना त्यांनी थेट यू-टर्न घेतला. आपल्याला मतदारसंघातून आणि विशेषतः महिला लोकप्रतिनिधींकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. कार्यकर्त्यांची तीव्र इच्छा आहे की मी उमेदवारी मागे घेऊ नये. असं ते म्हणाले.
या सगळ्या लोकांच्या भावनांचा आदर ठेवून आणि वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करूनच काय तो निर्णय घेऊ, असं त्यांनी म्हटलं होतं. तसंच, आपण शेवटपर्यंत ही लढाई लढण्यावर ठाम असल्याचा दावाही त्यांनी केला होता. जळगाव विधान परिषद मतदारसंघात महायुतीने भाजपकडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका रेश्मा काळे यांनी अपक्ष बंडखोरी केल्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.
गिरीश महाजन यांनी जळगावचा तिढा सुटल्याचे सांगितले असले, तरी रेश्मा काळे यांच्या या अचानक नॉट रिचेबल झाल्याने महायुतीच्या नेत्यांची धाकधूक कमालीची वाढली आहे. त्यांना भाजपच्या काही नगरसेवकांचा छुपा पाठिंबा असल्याचाही दावा केला जात आहे. त्यामुळे आता गिरीश महाजन या बंडखोरीचा तिढा कसा सोडवतात, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
