Download App

कर्जत एमआयडीसीत कंपन्या कधी येणार? रोहित पवारांनी वेधले विधानसभेत लक्ष

नगर : नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी कर्जत एमआयडीसीत कंपन्या कधी येणार असा प्रश्न विचारत राज्य सरकारचे लक्ष वेधले.

लक्षवेधी काळात रोहित पवार यांनी राज्याच्या उद्योग मंत्री उदय सामंत यांना प्रश्न विचारला. ते म्हणाले, उदय सामंत हे युवा मंत्री आहेत. त्यामुळे राज्यातील युवकांच्या आशा त्यांच्याशी जोडलेल्या आहेत. माझ्या मतदार संघातील युवकही त्यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत. माझ्या निवडणुकीच्या वेळी मी कर्जत-जामखेडच्या युवकांना रोजगार मिळवून देण्याचा शब्द दिला होता. कर्जत-जामखेडमध्ये क्षमता आहे मात्र संधी मिळाली नाही. येथील युवक नोकरी निमित्त मोठ्या शहरांत जात आहेत. महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन मंत्री सुभाष देसाई व आदिती तटकरे यांच्याकडे मी कर्जतमध्ये एमआयडीसी होण्यासाठी पाठपुरावा केला.

१८ नोव्हेंबर २०२१ला कर्जतमधील एमआयडीसीसाठी स्थळ पाहणी करण्यात आली होती. मंत्री सामंत यांनी राज्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक गुंतवणूक होणार असल्याचे सांगितले आहे. त्या कंपन्यांना कर्जतमधील एमआयडीसी दाखविण्यात आली आहे का? अहमदनगर जिल्ह्यातील नगर शहर, सुपा येथील एमआयडीसीतील भूखंड संपले आहेत. कर्जत एमआयडीसी दोन्ही एमआयडीसींना जवळ आहे. या एमआयडीसीसाठी राष्ट्रीय महामार्ग होणे आवश्यक होते त्यासाठी मी व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे रस्ते झाले. वीज आहे. एमआयडीसी मान्य केली आहे.त्यामुळे कर्जत एमआयडीसीत कंपन्या केव्हा येणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

यावर उदय सामंत यांनी सांगितले की, कायद्यानुसार या एमआयडीसीत कंपन्यांना मान्यता देऊ. शासनाला मध्यस्थी करून कंपन्या द्याव्या लागल्या तरी देऊ. कायदेशीर प्रक्रिया २०२३मध्ये पूर्ण करू. संबंधित कागदपत्रांवर अधिवेशन संपण्यापूर्वी सह्या होतील, असे सकारात्मक उत्तर दिले.

Tags

follow us