Rohit Pawar On Vidyanand Bapat : पुण्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून नारायण पेठेतील रहिवासी आणि पर्यावरणप्रेमी विद्यानंद बापट आपल्या भूमिकेमुळे चर्चेत आहे. त्यांनी गणेश उत्सवात डीजे विरोधात भूमिका घेतल्याने सध्या बापट सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. आज एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देत असताना विद्यानंद बापट यांना टिळक रोडवरील कशाळे चौकात मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून आरोपीवर कारवाई करण्याची मागणी पुणेकरांकडून होत आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, एका गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याने त्यांना मारहाण केली आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत ज्या टिळक रडत्यावर डीजेचा दणदणाट असतो त्याच टिळक रस्त्यावर त्यांना मारहाण करण्यात आली आहे. तर दुसरीकडे आता या घटनेविरोधात रोहित पवार देखील आक्रमक झाले आहे. विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणे हे पिसाटलेल्या मानसिकतेचे लक्षण आहे असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
एक्सवर याबाबत रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले की, गणेशोत्सवातील डीजे संदर्भात विद्यानंद बापट (Vidyanand Bapat) यांनी मांडलेल्या भूमिकेला तार्किक दृष्टीकोनातून बघण्याऐवजी त्यांच्यावर हल्ला करणे हे पिसाटलेल्या मानसिकतेचे लक्षण आहे. मतभेद असू शकतात, त्यांची भूमिका पटत नसेल तर वैचारिक विरोध करा, बापट ज्याप्रमाणे विचाराने भूमिका मांडतात त्याप्रमाणे भूमिका मांडा, परंतु अशाप्रकारे गुंडगिरी केली जाणार असेल तर हे अजिबात योग्य नाही . पोलीस प्रशासनाने बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्या गावगुंडावर योग्य त्या कायदेशीर कलमाअंतर्गत कारवाई करावी आणि विद्यानंद बापट यांना संरक्षण पुरवावे, ही विनंती असं एक्सवर रोहित पवार म्हणाले.
गणेशोत्सवातील डीजे संदर्भात विद्यानंद बापट यांनी मांडलेल्या भूमिकेला तार्किक दृष्टीकोनातून बघण्याऐवजी त्यांच्यावर हल्ला करणे हे पिसाटलेल्या मानसिकतेचे लक्षण आहे. मतभेद असू शकतात, त्यांची भूमिका पटत नसेल तर वैचारिक विरोध करा, बापट ज्याप्रमाणे विचाराने भूमिका मांडतात त्याप्रमाणे…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 3, 2026
ही पद्धत महाराष्ट्राच्या सुसंस्कृत आणि पुरोगामी परंपरेला अजिबात शोभणारी नाही – सुप्रिया सुळे
तर दुसरीकडे या प्रकरणात खासदार सुप्रिया सुळे यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. डीजेच्या विरोधात आग्रही भूमिका मांडणारे विद्यानंद बापट यांच्याशी माझे बोलणे झाले. त्यांना काही व्यक्तींनी केलेल्या मारहाणीची घटना अत्यंत निषेधार्ह आहे. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. आपल्याला एखाद्याचे मत मान्य नसले, तरी त्या मताचा आणि ते मांडण्याच्या अधिकाराचा आदर व्हायला हवा. मात्र, अलीकडच्या काळात विरोधी मत मांडणाऱ्यांचा आवाज दडपण्यासाठी मारहाण करणे, दांडगाई करून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करणे, ही प्रवृत्ती लोकशाहीसाठी घातक आहे. वैचारिक मतभेदांना हिंसेने उत्तर देण्याची ही पद्धत महाराष्ट्राच्या सुसंस्कृत आणि पुरोगामी परंपरेला अजिबात शोभणारी नाही. विद्यानंद बापट यांना झालेल्या मारहाणीचा आम्ही तीव्र निषेध करतो. गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे. बदलत्या काळाशी सुसंगत राहून, आपल्या संस्कृतीचे भान जपत हा उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा व्हावा. गणेशोत्सव हा समाजाला एकत्र आणणारा, आनंद देणारा आणि उत्साह वाढविणारा असावा, हीच सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
डीजे विरूद्ध आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला; टिव्ही शो दरम्यान घडला प्रकार
पोलिसांकडे सगळे फुटेज – विद्यानंद बापट
तर मी प्रतिक्रिया देत होतो तितक्यात एक वेडा आला आणि माझ्यावर हल्ला केला कारण मी निशस्र होतो. त्याला फक्त सवंग प्रसिद्धी हवी होती मी जस म्हणतो, घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् अगदी तसंच. आता पोलिसांकडे सगळे फुटेज आहे. त्यात पाहून पोलिसांनी त्याला ताब्यात घ्यावं आणि तुडवून काढावं म्हणजे त्याला कळेल मुद्द्याचं उत्तर मुद्द्याने द्यायचं असत गुद्याने नाही अशी प्रतिक्रिया या मारहाणीनंतर बापट यांनी दिली आहे.
