Rohit Pawar’s emotional post for Ajitdada : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी सकाळी झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले असून पवार कुटुंब, बारामती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी ही अपूर्णिय अशी हानी मनाली जात आहे. अजित पवारांच्या अकाली जाण्याने राज्यभर शोककळा पसरली असून समर्थकांकडून कुटुंब आणि पक्षाने लवकर या दुःखातून सावरण्याची प्रार्थना केली जात आहे.
दरम्यान, आज बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात, ज्या ठिकाणी अजित पवारांना अग्नी देण्यात आला होता, त्या ठिकाणी राख सवडण्याचा विधी पार पडला. या विधीनंतर आमदार रोहित पवार यांनी आपल्या काकांसाठी एक अत्यंत भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देत, ‘इतक्या लवकर आम्हाला का सोडून गेलात?’ असा हृदयस्पर्शी प्रश्न उपस्थित केला आहे.
रोहित पवारांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘मा. अजितदादांनी जिथं विकासरूपी फुलांची बाग फुलवली, तिथंच त्यांची राख सवडण्याची वेळ येईल, असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण नियतीच्या क्रूर खेळापुढे कुणाचाही काही चालत नाही. ती दुर्दैवी बातमी आल्यापासून आजतागायत डोकं सुन्न आहे. मन बर्फासारखं थिजलं आहे. काय झालं, कस झालं आणि का झालं, या प्रश्नांचा काहूर मनात थांबत नाही.’
मा. अजितदादांनी जिथं विकासरुपी फुलांची बाग फुलवली तिथंच त्यांची राख सावडण्याची वेळ येईल, असं कधी स्वप्नातही आलं नाही.. पण नियतीच्या क्रूर खेळापुढं कुणाचं काही चालत नाही.. अजितदादांची ती दुर्दैवी बातमी आल्यापासून अद्यापपर्यंत डोकं सुन्न आहे… मन बर्फाप्रमाणे थिजलंय.. काय झालं, कसं… pic.twitter.com/vxD2KKfybi
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 30, 2026
ते पुढे म्हणतात, ‘आपल्यात झालेल्या प्रत्येक संभाषणाचा, विशेषतः शेवटच्या काही दिवसांतील भावनिक चर्चांचा आवाज अजूनही कानात घुमतो आहे. जणू तुम्हीच अदृश्य स्वरूपात आमच्याशी बोलत आहात, असा भास होतोय.’ आपल्या पोस्टमध्ये रोहित पवारांनी अजित पवारांबद्दल एक भावनिक ‘तक्रार’ही व्यक्त केली आहे. ते लिहितात, ‘अजितदादा, तुमच्याविषयी माझी एक तक्रार आहे. दोन दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध आहे. लोकांच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नाहीत, आक्रोश ऐकून काळजाला चिर पडते. तुमच्या जाण्याने इतकं दुःख मागे राहील, याचा विचार तुम्ही का केला नाही? एरवी कुणी जरा जरी चुकलं, तरी चारचौघात खडसावणारे तुम्ही, त्या नियतीलाही तितक्याच जरबदार आवाजात का नाही खडसावलं?’
ते पुढे म्हणतात, ‘महाराष्ट्राची अजून कितीतरी कामं बाकी असताना, वेळ न घेता तू अशी आलीच कशी? दादा, तुमचा आवाज ऐकूनच ती घाबरली असती. पण तुम्ही तिलाही नाराज केलं नाही. आलेल्या प्रत्येकाचं काम करणं, हेच तर तुमचं वैशिष्ट्य होतं. आज दुःखाच्या पुरात बुडालेला महाराष्ट्र पाहून त्या नियतीलाही पश्चात्ताप होत असेल.’
दिल्लीतील गर्भवती SWAT कमांडोच्या हत्येने देश हादरला; किरण बेदींचा थेट सवाल, दोष कुणाचा?
राख सावडण्याच्या क्षणांचे वर्णन करताना रोहित पवार भावुक होऊन लिहितात, ‘आज तुमची राख जमा करत असताना असं वाटत होतं की फिनिक्स पक्ष्यासारखे तुम्ही या राखेतून पुन्हा उभे राहाल आणि नेहमीच्या खर्जातल्या आवाजात म्हणाल ‘अरे वेड्यांनो, का रडताय? मी तुमची गंमत करत होतो. एखाद्या संकटाला सामोरं जाण्याची तुमची तयारी तपासत होतो. आता उठा, कामाला लागा… महाराष्ट्रासाठी, इथल्या सामान्य माणसासाठी आपल्याला अजून खूप काम करायचंय.’
महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांपासून रोहित पवार आणि अजित पवार एकत्र काम करत होते. प्रचारसभा, उमेदवारांच्या मुलाखती आणि संघटनात्मक कामातून त्यांची जवळीक वाढली होती. अशा परिस्थितीत अजित पवारांच्या निधनामुळे केवळ पवार कुटुंबातच नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
