अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या तपासाबाबत मोठी अपडेट; सीआयडीमार्फत चौकशीचे आदेश

विमान दुर्घटनेच्या तपासाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. राज्य सरकारने या अपघाताची सीआयडीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

  • Written By: Published:
Untitled Design (343)

Order to investigate Ajit Pawar’s plane crash through CID : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे बुधवारी, 28 जानेवारी रोजी बारामतीजवळ झालेल्या विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून राज्य सरकारकडून तीन दिवसांचा शासकीय दुःखवटा जाहीर करण्यात आला आहे. गुरुवारी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या पार्थिवाला चिरंजीव पार्थ पवार आणि जय पवार यांनी मुखाग्नी दिला. यावेळी “अजित दादा अमर रहे”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. हजारो समर्थकांनी आपल्या लाडक्या नेत्याला साश्रुनयनांनी निरोप दिला.

दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर आता त्यांच्या विमान दुर्घटनेच्या तपासाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. राज्य सरकारने या अपघाताची सीआयडीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर बारामती पोलीसांना अपघातस्थळी कोणालाही प्रवेश न देण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. फॉरेन्सिक पथकाने आधीच घटनास्थळी भेट देऊन तपासासाठी आवश्यक नमुने गोळा केले असून, बारामती पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या Accidental Death Report च्या आधारे तपास करण्यात येणार आहे.

सरकारच्या प्राथमिक अहवालात काय नमूद आहे?

प्राथमिक अहवालानुसार, 28 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजून 18 मिनिटांनी संबंधित विमानाचा पहिल्यांदा बारामती एटीसीशी संपर्क झाला. त्या वेळी हवामानाबाबत माहिती देताना वारा कमी असल्याचे आणि दृश्यमानता सुमारे 3000 मीटर असल्याचे वैमानिकांना सांगण्यात आले. पायलटने आपण रनवे क्रमांक 11 च्या दिशेने येत असल्याचे कळवले; मात्र रनवे स्पष्टपणे दिसत नसल्याचेही नमूद केले. पायलटने “रनवे दिसू लागल्यानंतर कळवतो,” असे सांगितल्यानंतर सकाळी 8.43 वाजता रनवे क्रमांक 11 लँडिंगसाठी सज्ज करण्यात आला. मात्र त्यानंतर पायलटकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. काही क्षणातच धावपट्टीच्या डाव्या बाजूला आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट दिसू लागले, अशी माहिती एटीसीवरील अधिकाऱ्याने दिली.

केंद्रीय आर्थिक पाहणी अहवालानुसार महाराष्ट्रात महसुली तूट; लाडकी बहीण’सारख्या योजनांवर अप्रत्यक्ष ताशेरे

अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम काय सांगतो?

पुणे-बारामती परिसरात त्या वेळी दाट धुके होते आणि दृश्यमानता अत्यंत कमी होती. बारामती विमानतळ लहान असून येथे Instrument Landing System (ILS) ची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे पायलटला मॅन्युअल लँडिंगचा प्रयत्न करावा लागला. विमानाने थेट रनवेवर उतरण्याऐवजी मोठा वळसा घेतला, याचा अर्थ पहिला लँडिंग प्रयत्न रद्द करण्यात आला होता. धुक्यामुळे रनवेवर विमान योग्य रितीने align करणे कठीण झाले. त्यानंतर दुसरा लँडिंग प्रयत्न करण्यात आला. DGCA च्या सूत्रांनुसार, बारामतीचा रनवे हा टेबल-टॉप रनवे प्रकारातील असून, लँडिंगदरम्यान विमानाचा तोल गेला. सुमारे 100 फूट उंचीवरच विमान नियंत्रणाबाहेर गेले आणि रनवेपर्यंत पोहोचण्याआधीच जमिनीवर आदळले. आदळताच मोठा स्फोट झाला, त्यानंतर अनेक लहान स्फोट झाले. विमानाला भीषण आग लागल्यामुळे तात्काळ बचावकार्य करणे अशक्य झाले.

हादरवणारा CCTV आणि प्रत्यक्षदर्शींची माहिती

VSR वेंचर्स लिमिटेडचे लियर जेट 45 हे विमान लँडिंगच्या काही क्षण आधीच नियंत्रणाबाहेर गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट होते. अपघातानंतर विमानाचे तीन तुकडे झाले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले, “आम्ही तात्काळ धावत घटनास्थळी पोहोचलो, पण आगीच्या प्रचंड ज्वाळांमुळे काहीही करता आले नाही. काही मिनिटांतच संपूर्ण विमान जळून राख झाले.” सध्या या अपघाताचा सखोल तपास सुरू असून, DGCA चा अंतिम अहवाल आल्यानंतरच या भीषण दुर्घटनेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

follow us