Rohit Pawar’s statement raised eyebrows : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामतीत त्यांच्या स्मारक उभारणीसाठी हालचालींना वेग आला आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पवार कुटुंबाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून, या बैठकीत स्मारकासाठी जागा निश्चित करण्यासह इतर अनेक विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. विद्या प्रतिष्ठान, बारामती येथे स्मारकासाठी जागा निश्चित झाल्याची चर्चा असून, आज झालेल्या बैठकीला प्रतिभा पवार, शरद पवार, श्रीनिवास पवार, राजेंद्र पवार, रोहित पवार, रणजित पवार यांच्यासह विद्या प्रतिष्ठानचे काही विश्वस्त उपस्थित होते.
या बैठकीनंतर रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, 28 तारखेला अजितदादांचा विमान अपघात झाला. ते प्रचारासाठी निघाले असताना ही दुर्दैवी घटना घडली. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. अजित दादा मोठे नेतृत्व होते. जिथे त्यांचे उमेदवार आहेत, तिथे लोकांनी सहकार्य करावे. 28 तारखेनंतर कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही.
बैठकीत नेमकी काय चर्चा झाली?
रोहित पवार पुढे म्हणाले, पवार साहेब आमच्या परिवाराचे नेहमीच केंद्रबिंदू राहिले आहेत. राजकीय, सामाजिक आणि कौटुंबिक पातळीवर त्यांनी नेहमीच आम्हाला मार्गदर्शन केले. अडचणीच्या काळात अजित दादाही परिवारासोबत खंबीरपणे उभे राहिले. आज दादा नसले तरी पवार साहेबांचे मार्गदर्शन आम्हाला पूर्वीसारखेच मिळत आहे. जय पवार, पार्थ पवार, काकी आणि आम्ही सर्वजण व्यक्तिगत, ट्रस्टचे आणि सामाजिक विषय पवार साहेबांसमोर मांडतो. यात कुठेही राजकारण नाही. सर्वांचे मत आहे की अजितदादांच्या नावाने एक भव्य आणि लोकांना सहज भेट देता येईल असे स्मारक उभारावे. त्याचबरोबर दादांच्या 35-40 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीवर आधारित एक संग्रहालय (म्युझियम) असावे, अशीही परिवाराची आणि जनतेची इच्छा आहे.
स्मारक बारामती शहरात असावे की इतरत्र, याबाबत सर्व चर्चा झाली असून, येत्या काही दिवसांत परिवार आणि संबंधित सामाजिक संस्थांच्या विश्वस्तांकडून यासंदर्भात अधिकृत घोषणा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
तू एका बापाचा असशील तर मला मारायला ये…, मनोज जरांगे यांच धनंजय मुंडेंना आव्हान
राजकीय चर्चांवर रोहित पवारांची भूमिका
28 तारखेपासून गेल्या काही दिवसांत परिवारात कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. या दुःखद काळात राजकीय भूमिका घेणे भावनिकदृष्ट्या कठीण आहे. नऊ तारीख होऊ द्या, त्यानंतर या विषयावर स्पष्टपणे बोलता येईल, असे रोहित पवार म्हणाले. ते पुढे म्हणाले, अजित दादांची इच्छा काय होती, काय घडले, हे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. युती होईल किंवा विलीनीकरण होईल की नाही, यावर बोलण्याइतका मी मोठा नाही. मात्र सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे दुःख होते. अजित दादांसारख्या मोठ्या नेत्याच्या विचारांवर चर्चा न होता विषय भरकटताना दिसतो, याचे वाईट वाटते.
विमान अपघाताबाबत काय म्हणाले?
विमान अपघातासंदर्भात बोलताना रोहित पवार म्हणाले, विमानात नेमके काय घडले, कसे घडले, याबाबत नऊ तारखेनंतर स्पष्टपणे बोलता येईल. काही माहिती आम्हाला मिळाली आहे, काही माहिती आम्ही मागवत आहोत. एखादी घटना घडल्यानंतर सत्य लोकांसमोर येणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पवार परिवार म्हणून आणि महाराष्ट्राचा नागरिक म्हणून लोकांच्या मनातील शंका दूर व्हाव्यात, यासाठी राज्य सरकार, केंद्र सरकार आणि संबंधित कंपन्यांना योग्य प्रश्न विचारले जातील आणि त्यातून योग्य उत्तरे मिळतील, अशी अपेक्षा आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
