Rohit Pawar’s stay at the police station : बारामतीमध्ये आमदार रोहित पवार आणि स्थानिक पोलिसांमध्ये एफआयआर नोंदवण्याचा मुद्द्यावरून वादावादी झाल्याची घटना समोर आली आहे. यापूर्वी मुंबईतील मारिन ड्राइव्ह पोलीस स्टेशनमध्ये देखील त्यांची पोलिसांशी बाचाबाची झाली होती. संबंधित अपघात प्रकरणी एफआयआर दाखल करून घेण्याचाही मागणी करत त्यांनी दोन तास पोलीस ठाण्यात थांबून देखील तक्रार लिहून घेतली नसल्याने संताप व्यक्त केला.
माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी सांगितले की, 24 फेब्रुवारी रोजी डीजीसीएचा अहवाल समोर आल्यानंतर त्यांनी सर्वपक्षीय आमदार, पदाधिकारी आणि नागरिकांसह मुंबईत जाऊन एफआयआर करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मते, 28 जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघाताबाबत डीजीसीएच्या अहवालात व्हीएसआर कंपनीकडून निष्काळजीपणा झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या निष्कर्षांच्या आधारे गुन्हा दाखल व्हावा, अशी त्यांची मागणी आहे.
ते पुढे म्हणाले की, बीएनएसएस 2023 अंतर्गत झिरो एफआयआरची तरतूद असून कोणत्याही ठिकाणी एफआयआर दाखल करून तो संबंधित ठिकाणी वर्ग करता येतो. त्यामुळे मुंबईत तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तेथे देखील तक्रार स्वीकारण्यात आली नाही. त्यांनी कलम 173(1) चा उल्लेख करत नागरिकांना एफआयआर नोंदवण्याचा अधिकार असल्याचे सांगितले आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला दिला.
रोहित पवार यांनी स्पष्ट केले की, संबंधित विमान हे लेयर जेट 45 एक्सआर प्रकारातील असून ते व्हीएसआर कंपनीकडे होते. कंपनीकडे अशा प्रकारची सात विमाने होती. त्यापैकी एका विमानातून प्रवास करत असताना अपघात घडला. 2023 मध्ये मुंबईत एका विमानाची दुर्घटना झाली होती आणि उर्वरित पाच विमानांवर 24 फेब्रुवारीच्या आदेशानुसार उड्डाणबंदी घालण्यात आली. अशा परिस्थितीत अपघातग्रस्त विमानाची स्थिती योग्य होती का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
अहिल्यानगर महापालिकेत स्वीकृत नगरसेवक, महिला बालकल्याण व स्थायी समिती सदस्यांची घोषणा
त्यांच्या मते, हा एफआयआर व्हीएसआर कंपनी, तिचे मालक आणि संबंधित अधिकाऱ्यांविरोधात असावा. विमान उड्डाणास सक्षम आहे की नाही, याची जबाबदारी डीजीसीएची असते. संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य तपासणी केली का, याची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच विमान नियोजन करणाऱ्या ‘अॅरो’ कंपनीच्या भूमिकेचाही तपास व्हावा, असे ते म्हणाले. खासगी व्हॉट्सअॅप ग्रुपमधील संवादाचा उल्लेख करत त्यांनी हवामान आणि विमानाची स्थिती ‘ओके’ असल्याचे सांगण्यात आल्याचा दावा केला.
याप्रकरणी कोणत्याही केंद्रीय मंत्र्याचे नाव एफआयआरमध्ये नमूद केले नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी म्हटले की, जर कोणत्याही कंपनीचे आणि संबंधित पक्षाचे आर्थिक संबंध सिद्ध झाले, तर नैतिक जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. मात्र सध्या त्यांची मागणी केवळ कायदेशीर चौकशी आणि एफआयआर नोंदवण्यापुरती मर्यादित आहे.
एफआयआर नोंद होत नसल्याबाबत प्रश्न उपस्थित करत त्यांनी अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूच्या प्रकरणाचा संदर्भ दिला. त्या वेळी मोठ्या प्रमाणावर चौकशीची मागणी झाली. मग राज्याचे माजी उपमुख्यमंत्री असलेल्या अजित दादांच्या मृत्यूप्रकरणी एफआयआर का घेतला जात नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या मते, घटनेला महिना उलटूनही तपासात ठोस प्रगती दिसत नसल्याने संशय निर्माण होत आहे.
दरम्यान, पोलिसांकडून अपघात अहवाल दाखल झाल्याचे कारण देत एफआयआर नोंदवता येणार नसल्याचे सांगण्यात आल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
