Rohit Pawar’s suggestive statement : राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी परभणी दौऱ्यात सत्ताधाऱ्यांवर आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला. परभणीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील पक्षफोड, शेतकरी प्रश्न, राम मंदिर निधी, शक्तीपीठ महामार्ग आणि NEET पेपरफुटी यांसह अनेक मुद्द्यांवर भूमिका मांडली.
अलीकडेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांना आपल्या गटात आणत मोठा राजकीय धक्का दिला. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)तील काही खासदारही सत्ताधाऱ्यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आमच्या खासदारांच्या संपर्कात भाजप किंवा शिंदे गटातील नेते असू शकतात, पण आमचे खासदार कोणत्याही परिस्थितीत फुटणार नाहीत. आमच्या खासदारांवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे.”
यावेळी त्यांनी भाजपवर गंभीर आरोप करत म्हटले की, केंद्र सरकारला आगामी डी-लिमिटेशन आणि महत्त्वाचे कायदे मंजूर करून घ्यायचे असल्यामुळे खासदारांची संख्या वाढवण्यासाठी आणि विरोधकांना कमकुवत करण्यासाठी पक्षफोडीचे राजकारण सुरू आहे. तसेच राज्यातील भाजपच्या एका मोठ्या नेत्याला केंद्रात मोठी जबाबदारी दिली जाणार असून, एका छोट्या नेत्याकडे राज्यातील मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते, असा दावा त्यांनी केला. शिवाय, उद्धव ठाकरे गटातून फुटलेल्या सहा खासदारांपैकी एका खासदाराला केंद्रीय मंत्रिपद मिळू शकते, असेही ते म्हणाले.
राजकारणात मोठी खळबळ; उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, घडामोडींना वेग
शेतकरी प्रश्नावर बोलताना रोहित पवार यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्यावरही भाष्य केले. अधिवेशनात त्यांनी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला असला तरी ते पूर्वीसारखे आक्रमक दिसत नसल्याचे पवार म्हणाले. खतांच्या वाढलेल्या किंमती, बँकांकडून शेतकऱ्यांना मिळत नसलेले पीक कर्ज आणि घटलेले कर्ज वितरण यामुळे शेतकरी गंभीर संकटात असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रश्नांवर एकत्रित लढा देण्यासाठी बच्चू कडूंनी आमच्या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
याशिवाय, राम मंदिर निधी, शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प आणि खासदार फोडण्यासाठी पैशांचा वापर होत असल्याचे गंभीर आरोपही रोहित पवार यांनी केले. NEET पेपरफुटी प्रकरणातील चौकशीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत, चौकशी केवळ नावापुरती सुरू असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांपर्यंत कारवाई पोहोचत नसल्याचा आरोप केला.
राज्यातील पक्षफोडीच्या राजकारणावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करताना शेतकरी प्रश्न, शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी आणि विविध विकासकामांतील कथित गैरव्यवहारांवरही रोहित पवार यांनी सरकारला धारेवर धरत अनेक गंभीर आरोप केले.
