पिंपरी-चिंचवड हादरलं! युवराज रेस्टॉरंटमध्ये धारदार शस्त्राने हल्ला करत आरपीआय नेते अनिल मोरे यांची हत्या

युवराज रेस्टॉरंटमध्ये बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अनिल मोरे यांच्यावर अज्ञात आरोपींनी अचानक प्राणघातक हल्ला केला.

Untitled Design 25

Untitled Design 25

RPI leader Anil More murdered : पिंपरी-चिंचवड शहराला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आरपीआय कामगार आघाडीचे पदाधिकारी आणि आरपीआय (आठवले गट) चे सक्रिय नेते अनिल मोरे यांची मोशी परिसरात धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली आहे. बुधवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोशी परिसरातील युवराज रेस्टॉरंटमध्ये बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अनिल मोरे यांच्यावर अज्ञात आरोपींनी अचानक प्राणघातक हल्ला केला. धारदार शस्त्राने वार करत आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. सध्या त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन वायसीएम रुग्णालयात करण्यात आले आहे.

या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी प्राथमिक तपासात पूर्ववैमनस्यातून हा खून झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हॉटेल परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. आरोपींच्या शोधासाठी विविध पथके रवाना करण्यात आली असून तपास वेगाने सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर वायसीएम रुग्णालय परिसरात आरपीआय कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणी करत कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. जोपर्यंत मारेकऱ्यांना अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा आरपीआय कामगार आघाडी पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष वैभव रोखडे यांनी दिला आहे.

निवडणुकीच्या काळात पंतप्रधानांना गांभीर्य नव्हते का? खासदार शरद पवारांचा सवाल

वैभव रोखडे यांनी पोलिस प्रशासनावरही गंभीर आरोप केले आहेत. घटनेला 12 तास उलटून गेले तरी आरोपी सापडत नाहीत, ही दुर्दैवी बाब आहे. ज्या हॉटेलमध्ये घटना घडली, तेथे रात्री उशिरापर्यंत अवैध दारूविक्री सुरू होती. पोलिसांना याची माहिती असूनही कारवाई झाली नाही. आम्ही वारंवार सूचना दिल्यानंतरच हॉटेल बंद करण्यात आले. यामध्ये पोलिस प्रशासनाचा हलगर्जीपणा स्पष्ट दिसतो, असा आरोप त्यांनी केला. तसेच आरोपींना अटक झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

अनिल मोरे हे आरपीआयच्या कामगार आघाडीमध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत होते आणि कामगार प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या हत्येची बातमी समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त होत आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनिल मोरे यांना श्रद्धांजली वाहत या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

दरम्यान, पोलिस प्रशासनाने नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा सक्रिय झाली असून, लवकरच गुन्हेगारांना अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

Exit mobile version