Rupali Thombre : गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे यांच्यात सुरु असणारा राजकीय संघर्ष चर्चेचा विषय बनले आहे. रुपाली चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत तर रुपाली ठोंबरे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ता पदाची जबाबदारी आहे.
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरुन रुपाली ठोंबरे (Rupali Thombre) आणि रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्यात आरोप- प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. रुपाली ठोंबरे यांच्याकडून रुपाली चाकणकरांवर करण्यात आलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. तसेच या नोटीसला 7 दिवसात उत्तर देण्यात यावे अशी सूचना देखील पक्षाकडून रुपाली ठोंबरे यांना करण्यात आल्या आहे.
तर आता या प्रकरणी रुपाली ठोंबरे यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. मला पक्षाची नोटीस नाही तर खुलासा पत्र काल रात्री दिला आहे. रूपाली चाकणकर यांच्या बाबतीत माध्यमावर जे वक्तव्य केलं त्याच्या बाबतीतला खुलासा मला माझ्या पक्षाने मागितला आहे. कायदेशीर खुलासा आणि त्या पत्राला उत्तर मी देणार आहे. माझा बचाव किंवा सत्य मी खुलासामधून मांडेल. मी कायदेशीर खुलासा करेल असं रुपाली ठोंबरे यांनी म्हटलं आहे.
तर दुसरीकडे यावेळी रुपाली ठोंबरे यांनी माधवी खंडाळकर मारहाण प्रकरणात देखील प्रतिक्रिया दिली. यावेळी रुपाली ठोंबरे म्हणाल्या की, यांनी कुणाला कॉल केले याचे सीडीआर मी काढणार आहे. पोलीस स्टेशनमध्ये वाद गेल्यानंतर सुरुवातीला तो वाद संपला होता मात्र त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. सीपींना तक्रार दिल्यानंतर पुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आधी तक्रारी मागे घेतल्या मग गुन्हा दाखल का केला? मी देखील माधवी खंडाळकर यांच्यावर 354 चा गुन्हा दाखल केला आहे. त्या आज अजित पवारांना भेटल्या त्यांना कुणीही भेटू शकता. माधवी खंडाळकर यांनी जो गुन्हा दाखल केला तो कुणाच्या सांगण्यावरुन दाखल करण्यात आला याचा तपास करावा अशी विनंती सीपींना विनंती केली आहे अशी माहिती देखील माध्यमांशी बोलताना रुपाली ठोंबरे यांनी दिली.
पुरावे देणार
तर दुसरीकडे रुपाली चाकणकरांवर बोलताना रुपाली ठोंबरे म्हणाल्या की, मी त्यांच्या आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागितला आहे. पक्ष आणि आयोग वेगळा आहे. या आधी देखील सोशल मीडियावर माझ्या विरोधात पोस्ट केली होती.
ती मुलगी देखील रुपाली चाकणकर यांचीच होती. स्नेहल चव्हाण असं त्या मुलीचं नाव आहे. हे सगळे पुरावे सुनील तटकरे आणि अजित पवार यांना दिले आहेत. माझ्या खुलासा पत्रामध्ये हे सगळे पुरावे देणार आहे असं रुपाली ठोंबरे म्हणाल्या.
