Rupali Thombre demands Rupali Chakankar’s resignation : नाशिकमध्ये एका धक्कादायक प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे. तथाकथित अंकशास्त्रज्ञ आणि राजकीय वर्तुळात वावरणारा अशोक खरात याला अत्याचाराच्या गंभीर आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. धार्मिक श्रद्धा, दैवी शक्ती आणि मंत्रतंत्राच्या आडून महिलांचा विश्वास संपादन करून अत्याचार केल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
गुन्हे शाखेच्या युनिट-1 पथकाने बुधवारी पहाटे कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, कॅनडा कॉर्नर येथील त्याच्या कार्यालयावर पोलिसांनी छापा टाकला असता एक पेन ड्राइव्ह जप्त करण्यात आला. या पेन ड्राइव्हमध्ये तब्बल 58 संशयास्पद व्हिडिओ आढळल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणाला आता राजकीय वळण देखील मिळाले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यासोबत अशोक खरात यांचा संबंध असल्याचा आरोप होत आहे. त्यांच्या पाद्यपूजेचा एक व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले. त्या म्हणाल्या, हा विषय कोणत्याही पक्ष किंवा जातीपुरते मर्यादित नसून महिलांच्या सुरक्षेशी संबंधित आहे. एक वर्षांपूर्वीच या प्रकरणाची माहिती समोर आणण्यात आली होती. संबंधित ट्रस्टवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा असल्यामुळे पोलीस कारवाईवर परिणाम झाला का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
इराणच्या साउथ पार्स गॅस फील्डवरील हल्ल्यानंतर तणाव वाढला; भारतात तेल-गॅस दर वाढण्याची शक्यता
तसेच, जप्त करण्यात आलेल्या 58 व्हिडिओंचा उल्लेख करत त्यांनी अनेक महिलांवर अत्याचार झाल्याची भीती व्यक्त केली. जर रुपाली चाकणकर यांनी तात्काळ राजीनामा दिला नाही, तर पुरावे नष्ट होण्याची शक्यता असल्याचा आरोप देखील केला आहे. रुपाली पाटील ठोंबरे पुढे म्हणाल्या की, या प्रकरणाशी संबंधित सर्व ट्रस्टवर गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे. अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देखील त्यांनी दिला. तसेच हा मुद्दा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, या प्रकरणाचा मूळ तपास पाहता, 35 वर्षीय महिलेने सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला असून, त्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अशोक खरात हा सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असून, तो मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाल्यानंतर कोस्मोलॉजी एक्स्पर्ट आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होता. आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
