Download App

Sadabhau Khot : दुतोंडी गांडूळांचा देशात गोंधळ… असे म्हणत शरद पवार, राहुल गांधींवर टीका!

  • Written By: Last Updated:

पुणे : आज अडाणी अडाणी म्हणून बोंब मारत आहेत. ही तुमच्याच बापजाद्यांची पुण्याई आहे. हे बियाणं आजचं नाही. याची पेरणी तुम्हीच केली आहे ना, त्याला कणसं आता आली आहेत. हे म्हणजे असं झालं पहिल्या पंगतीला जेवायचं आणि म्हणायचं की जेवण खराब होतं, खारट होतं. आता मला उलट्या होत आहे, अरे पण मी म्हणतो उलट्या होईपर्यंत तुम्हीच खात होतात ना, मग आता का बोंब मारताय. हे दुतोंडी गांडूळासारखं बेंडबाजा वाजवण्याचा प्रकार आहे. देशात सध्या या दुतोंडी गांडूळांचा गोंधळ सुरु आहे, अशा शेलक्या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) तसेच काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी टीका केली.

काही वर्षांपूर्वी भंडारा येथे प्रफुल पटेल यांच्या वडिलांच्या स्मृतिदिन कार्यक्रमात स्वतः शरद पवार यांनी प्रफुल पटेल यांना सांगितले की, हा गौतम अडाणी अतिशय गरीब कुटुंबातील आहे. पण कष्टाळू आहे. त्याला घेऊन भंडारा येथे एक ऊर्जा प्रकल्प सुरु कर आणि त्या गौतम अडाणीबद्दल तुम्ही तुमच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात लिहिले आहे, मग आता का अडाणी अडाणी म्हणून बोंब मारत आहेत, असा प्रश्न सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला.

या देशात सध्या दुतोंडी गांडूळांचा गोंधळ घालण्याचे काम सुरु आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना स्वतःचा इतिहास काय हे माहितच नाही. गौतम अडाणी यांना मोठे करण्याचे काम काँग्रेस कार्यकाळात झाले आहे, याची माहिती राहुल गांधी यांनी घ्यावी. तसेच आपला इतिहास जरा धुंडळावा, मग कळेल. तसेच स्वतः लिहिलेलं ‘लोक माझे सांगाती’ हे पुस्तक पुन्हा एकदा शरद पवार यांनी वाचावे. त्यात त्यांनी काय लिहिले आहे, हे जरा तपासून पाहावे. आज ते अडाणी अडाणी म्हणून बोंब मारत आहेत. मात्र, शरद पवार यांनीच त्यांच्या पुस्तकात गौतम अडाणी यांचे कौतुक केले आहे. त्यामुळे लोकांना वेड्यात काढण्याचे काम काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने बंद करावे, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.

Tags

follow us