Sagar Mohalkar shooting case unraveled : जामखेड तालुक्यातील नुराणी कॉलनी परिसरात पैलवान सागर मोहोळकर याच्यावर गोळीबार करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत मुख्य आरोपीला जेरबंद केले असून या गुन्ह्यात वापरलेले शस्त्र आणि इतर साहित्य देखील जप्त केले आहे.
4 मार्च 2026 रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तपनेश्वर रोड ते खाडेनगर मार्गावरील नूरानी कॉलनी परिसरात अज्ञात आरोपी मोटारसायकलवरून आले आणि पैलवान सागर किसन मोहोळकर याच्यावर गावठी कट्ट्यातून गोळीबार केला. या हल्ल्यात मोहोळकर याला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेप्रकरणी किसन चांगदेव मोहोळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेनंतर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपार पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. हा गुन्हा पूर्ववैमनस्यातून घडल्याची शक्यता लक्षात घेऊन आरोपींचा शोध घेण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला देण्यात आले. या आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके तयार करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी परिसरात तपास सुरू केला.
राज्यात आजपासून नवीन ऑटो रिक्षा परवाने नाहीत; रिक्षांचा सुळसुळाट थांबवण्यासाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
घटनास्थळाची पाहणी, स्थानिकांकडून माहिती आणि पूर्वीच्या वादांची चौकशी करताना या गुन्ह्यामागे अभिमन्यू पोते आणि त्याच्या साथीदारांचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी जिक्री (ता. जामखेड) गावाच्या शिवारात छापा टाकून अभिमन्यू महादेव पोतेयाला ताब्यात घेतले.चौकशीत त्याने चार्ली उर्फ माउली उर्फ ज्ञानेश्वर साठे, रोहित विठ्ठल आखाडे आणि चिन्या नावाचा अन्य साथीदार (सर्व राहणार कोथरूड, पुणे) यांच्या मदतीने हा हल्ला केल्याची कबुली दिली.
पूर्वीच्या वादातून सागर मोहोळकर याला ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांनी हा कट रचल्याचे समोर आले आहे. या तिघांचा सध्या पोलिसांकडून शोध सुरू आहे. पोलिसांनी आरोपी अभिमन्यू पोते यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला सुमारे 35 हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस, सुमारे 40 हजार रुपये किमतीची विनानंबर ज्युपिटर मोटारसायकल आणि 15 हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण सुमारे 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक केलेल्या आरोपीला पुढील तपासासाठी जामखेड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपस जामखेड पोलीस करत आहेत.
