जालना : राजकीय स्थान टिकवण्यासाठी मंत्री छगन भुजबळ हे दोन समाजांत भांडणं लावण्याचे पाप करत आहेत, राज्य सरकारमधील एक मंत्री अशी भूमिका घेत आहे याला राज्य सरकार सहमत आहे का? असा सवाल करत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal )यांची मंत्री पदावरून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी स्वराज्य संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. मंत्री भुजबळ यांच्या जालना येथील सभेत केलेली वक्तव्यांनंतर समाज माध्यमांमधून त्यांनी ही मागणी केली. (Sambhaji Raje Chhatrapati, demanded that Chhagan Bhujbal should be sacked from the post of minister immediately.)
यावेळी बोलताना भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील, राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार, राजेश टोपे यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले की, जरांगे मला विचारतात की, मी कुणाचं खातो? अरे मी काय तुझं खातो का? हा छगन भुजबळ स्वकष्टाचं खातो. तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडा मोडत नाही. असे छगन भुजबळ म्हणाले. तेसेच ते पुढे म्हणाले की, आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही पण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये. 56 मराठी मोर्चे पण आम्ही कुणालाही विरोध केला नाही. तसेच आम्ही कुणाची घरं दारं देखील जाळली नाहीत.
ओबीसी आरक्षणावर प्रश्न उपस्थित करता पण ओबीसीतील सर्व जाती या कायद्याने आल्या आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला गरिबी हटाव मोहिमेसारखी वागणूक देऊ नका. तसेच मराठा समाज ओबीसी आरक्षणामध्ये अवैधरित्या घुसतो आहे. असे छगन भुजबळ म्हणाले. ईडब्लूएसमध्ये मराठा समाजाला जो लाभ मिळाला तो ओबीसींना देखील मिळालेला नाही. मराठा समाजाला 10-11 कोटी मिळतात. 85 टक्के मराठा समाज ईडब्लूएसचा लाभ घेतोय, असाही दावा त्यांनी केला.
भुजबळ पुढे म्हणाले की लाठीचार्ज झाल्यावर हे सरदार घरात जाऊन बसले. आमचे राजेश टोपे साहेब आणि छोटे साहेब रोहित पवार यांनी त्याला पहाटे तीन वाजता परत आणून बसवले.त्याला सांगितलं शरद पवारसाहेब येणार आहेत. शरद पवारांना लाठीचार्ज का झाला, पोलिसांवर हल्ले कसे झाळे हे सांगितलं नाही, अशी टीका त्यांनी केली.