Sandeep Kshirsagar : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन वातावरण तापले आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्या अटकेसाठी बीड जिल्ह्यात आज सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादीचे आमदार जितेद्र आव्हाड यांच्यासह बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते आमदार, खासदार सहभागी झाले आहेत. तसंच, मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती असून महिला वर्गाचेही प्रमाण लक्षवेधी आहे. या मोर्चापूर्वी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट मंत्री धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केलीय. तसेच, वाल्मिक कराडने 20 खून केल्याचे गंभीर आरोप देखील केले आहेत.
तर, दुसरीकडे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी देखील थेट मुख्यमंत्री फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांना लक्ष केलं आहे. ते म्हणाले, “त्या विंड मिलच्या प्रकारात तो वॉचमन बौद्ध समाजाचा होता. संतोष देशमुख मराठा समाजाचे होते. जेव्हा वॉचमनला तिथे मारहाण करण्यात आली. खंडणीसाठी वाल्मिक कराडचे गुंड लोक तिथे गेले.
वॉचमनने त्यांना अडवलं म्हणून त्याला मारहाण केली. तिथे संतोष देशमुख यांनी उघड भूमिका घेऊन त्यांना रोखल” असं आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले. “मी ओबीसी आहे. पहिला ओबीसी आहे, जो ठामपणे सांगतो, वाल्मिक कराडला आत टाका. गावच्या लोकांना जिल्ह्यातले सर्व आमदार भेटले, अधिवेशनात आवाज उठवू सांगितलं” असं संदीप क्षीरसागर म्हणाले.
“सीएम साहेबांच्या जवळचे अभिमन्यू पवार यांना मी, जेव्हा ही घटना सांगितली, तेव्हा त्यांनी संभागृहात साथ दिली. हा जाती-पातीचा विषय नाही. सुरुवातीला म्हटलेलं राजकारण आणणार नाही, या सर्वांनी साथ दिली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे बोलले, दोषी कोणी असेल तरी त्याला सोडणार नाही” असं संदीप क्षीरसागर म्हणाले.
वाल्मिक कराड रक्तपिपासू
वाल्मिक कराड विषयी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी,” बीडमध्ये अर्ध्याहून अधिक खून वंजाऱ्यांचेच झालेत आणि तेही यांनीच केले आहेत. वाल्मिक कराड हा नरभक्षक वाघ कसा असतो, तसा नरभक्षक वाल्मिकी आहे. खरं तर वाल्मिकी कोणीही म्हणू नका, तो वाल्या आहे, या वाल्याला कधी पकडणार हे पोलिसांनी सांगायला हवं, वाल्मिक कराड हा आधुनिक वाल्या रक्तपिपासू आहे. आत्तापर्यंत 20 वंजारा समाजाचे खून त्याने केले आहेत. आमची जात यांच्यामुळे बदनाम होते आहे, धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढा, अशी पहिली मागणी मी केली होती, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर हल्लाबोल केला आहे.