बीड : जिल्ह्यातील काका पुतण्याच्या लढतीत पुन्हा पुतण्यानं बाजी मारल्याचं पाहायला मिळतंय. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व पुतणे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यातील राजकीय वादानंतर बीड तालुक्यातील नवगण राजुरीकरांनी संदीप क्षीरसागर यांच्याच गटाला झुकतं माप दिलंय.
ग्रामपंचायत निवडणूक निकालात आज संदीप क्षीरसागर गटाच्या सरपंचपदासह सर्व सदस्यांनी एकतर्फी विजय मिळविलाय. जिल्ह्याच्या राजकारणावर एकेकाळी अधिराज्य असलेल्या दिवंगत लोकनेत्या केशरबाई क्षीरसागर यांची राजकीय कारकिर्द देखील नवगण राजुरीच्या (ता. बीड) सरपंच म्हणूनच सुरु झाली.
दिवंगत लोकनेत्या केशरबाई क्षीरसागर यांचे बीड तालुक्यातील नवगण राजुरी हे बाजारपेठेचे व जिल्हा परिषद सर्कलचे गाव आहे. त्यामुळे या गावाला तगडं राजकीय महत्व आहे. दिवंगत केशरबाई क्षीरसागर देखील येथील सरपंच राहिल्या आहेत. त्यांच्यानंतर ग्रामपंचायतीची सत्ता कायम त्यांचं चिरंजीव रवींद्र क्षीरसागर यांच्या अधिपत्याखाली राहिली. त्यांच्यासह खुद्द त्यांच्या दिवंगत पत्नी व आमदार संदीप क्षीरसागर यांच्या आई रेखाताई क्षीरसागर यांनी देखील येथील सरपंचपद सांभाळलं.