Sangli News : सरकारी विभागात भ्रष्टाचाराची कीड किती खोलवर रुजली आहे (Sangli News) याची आणखी एक घटना समोर आली आहे. तब्बल सात लाख रुपयांची लाच घेताना सांगली महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे लाचलुपतच्या जाळ्यात अडकले आहेत. उपायुक्त साबळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिका हद्दीतील एका 24 मजली इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी साबळे यांनी एकूण 10 लाख रुपये लाच (bribe) मागितली होती. यातच सात लाखांवर तडजोड झाली होती.
पैसे देण्याआधी तक्रारदाराने एसीबीशी संपर्क साधला. त्यांना या सर्व प्रकाराची माहिती दिली. उच्चपदस्थ अधिकारी इतकी लाच मागतोय म्हटल्यानंतर प्रकरण गंभीर होते. सावधगिरी बाळगून सापळा रचण्यात आला. तक्रारीत सांगितल्याप्रमाणे उपायुक्तांनी सात लाख रुपये लाच घेतल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी एसीबीने वैभव साबळे यांच्याविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
समृद्धीची श्वेतपत्रिका काढा, 15 हजार कोटींचा भ्रष्टाचार उघड होईल; हर्षवर्धन सपकाळांचं खुलं चॅलेंज
उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यावर प्रथमच कारवाई झाल्याने सांगलीत खळबळ उडाली आहे. उपायुक्त साबळेंच्या घराची सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत झडती सुरू होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर साबळेला अटक करण्यात आली आहे. सांगलीतील एका 24 मजली इमारतीच्या बांधकामाचा परवाना मंजूर करण्यासाठी साबळेने दहा लाख रुपयांची मागणी केली होती.
याबाबत 17 फेब्रुवारी रोजीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल झाली होती. यानंतर 25 फेब्रुवारीला या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. या पडताळणीत साबळेने तडजोडीअंती सात लाख रुपयांची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर सोमवारी ही कारवाई करण्यात आली. यानंतर साबळे विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत नूतन उपअधीक्षक अनिल कटके, तत्कालीन उपअधीक्षक उमेश पाटील यांच्या नेतृत्वात विनायक भिलारे, किशोर खाडे, प्रतीम चौगुले, अजित पाटील, सलीम मकानदार, ऋषीकेश बडणीकर, पोपट पाटील, उमेश जाधव, रामहरी वाघमोडे, सीमा माने, धनंजय खाडे, सुदर्शन पाटील, अतुल मोरे, चंद्रकांत जाधव, विणा जाधव आदींनी सहभाग घेत कारवाई यशस्वी केली.
शेतजमिनीचं काम अन् 5 लाखांची लाच; उपजिल्हाधिकारी ACB च्या जाळ्यात
सिस्टीम मूक अन् अंध : विजय कुंभार
दरम्यान, या प्रकारावर सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी फेसबूक पोस्ट लिहीत संताप व्यक्त केला. हा तोच वैभव साबळे आहे, ज्याने एमपीएससी परीक्षा “कर्णबधीर” असल्याचं खोटं प्रमाणपत्र लावून पास केली होती. गंमत म्हणजे, १९९३ साली ज्या दिवशी जन्म झाला त्याच दिवशीच त्याला कर्णबधीर असल्याचं सर्टिफिकेट मिळालं. हे सगळं माहित असूनही यंत्रणेकडून काहीतरी कारवाई झाली का? नाही!
पूजा खेडकर प्रकरण (Pooja Khedkar) उघड झाल्यानंतरच साबळेने शोभेच्या श्रवणयंत्राचा वापर सुरू केला. त्याआधी तो कधीही ते वापरत नव्हता. लोकांच्या तक्रारींच्या ढिगाऱ्यानंतरही यंत्रणेला जाग आली नाही. का? कारण बहुतेक याच यंत्रणेतील अनेक लोकही हाच फसवेगिरीचा मार्ग वापरूनच सेवेत आले आहेत असा गंभीर आरोप विजय कुंभार यांनी केला आहे. सरळ शब्दांत सांगायचं झालं तर सिस्टम आतून सडलीय आणि ही सडलेली सिस्टमच आज कर्णबधीर नाही तर संपूर्णतः मूक आणि अंध झाली आहे असा संताप कुंभार यांनी व्यक्त केला आहे.