Sanjay Gaikwad will be questioned by the police : क्रॉमेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता? या पुस्तकावरून उद्भवलेल्या वादात आता नवे वळण आले आहे. पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकावल्याप्रकरणी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे, न्यायालयाने पोलिसांना संजय गायकवाड यांच्या चौकशीची परवानगी दिली असून, त्यामुळे या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे.
प्रकाशक प्रशांत आंबी यांनी काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमधील राजारामपुरी पोलीस ठाण्यात संजय गायकवाड यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र पोलिसांनी सुरूवातीला गुन्हा नोंदवण्यास नकार दिला होता. त्यानंतर न्यायालयात धाव घेतल्यानंतर आता पोलीस चौकशीसाठी परवानगी मिळाल्याने प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. राजारामपुरी पोलिसांकडून आता संजय गायकवाड यांना नोटीस बजावली जाऊ शकते किंवा त्यांचे म्हणणे लेखी स्वरूपात नोंदवले जाऊ शकते. दरम्यान, प्रकाशक प्रहसनात आंबी यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, गेल्या महिनाभरात त्यांना संजय गायकवाड यांच्या समर्थकांकडून शंभरहून अधिक धमकीचे फोन आले आहेत. या धमक्यांबाबत नव्याने पोलिसांत तक्रार देणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं.
ऑपरेशन टायगर की जागावाटप? एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर; अमित शाहांची घेणार भेट
नेमका वाद कशामुळे?
दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी सुमारे 37 वर्षांपूर्वी लिहिलेल्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकातील मजकुरावरून हा वाद निर्माण झाला. पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आल्याचा आरोप करत संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून शिवीगाळ केली होती. एवढेच नव्हे तर पुस्तकाची छपाई केल्यास घरी येऊन मारेन अशी धमकी दिल्याचाही आरोप आहे.
या फोन संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात मोठा गदारोळ उडाला होता. संभाषणात संजय गायकवाड यांनी दिवंगत गोविंद पानसरे यांच्याविषयीही आक्षेपार्ह भाषा वापरल्याचे समोर आले होते. त्यानंतर प्रशांत आंबी यांनीही आक्रमक भूमिका घेत बुलढाण्यातील संजय गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते.
IMD Rain Alert : पुणे, कोल्हापूर, रायगडसह ‘या’ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस; अलर्ट जारी
व्हायरल ऑडिओमध्ये संजय गायकवाड यांनी, गोविंद पानसरे हा छत्रपती शिवाजी महाराजांना एकेरीत शिवाजी म्हणणारा कोण होता? मला हे पुस्तक वाचायची गरज नाही. तुमच्यासारखे लोक शिवाजी महाराजांचा अपमान करतात. त्या गोविंद पानसरेचं काय झालं माहिती आहे ना? तुलाही घरात घुसून मारेन, अशी धमकी दिल्याचा दावा करण्यात आला होता.
यावर प्रशांत आंबी यांनी शांतपणे भूमिका मांडत, हे पुस्तक 1988 साली प्रकाशित झाले असून त्यामागे शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा हेतू नाही. आधी पुस्तक वाचा, असे गायकवाड यांना सांगण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यानंतरही शिवीगाळ सुरूच राहिल्याचा आरोप आहे. आता न्यायालयाने पोलिस चौकशीसाठी हिरवा कंदील दिल्यानंतर या प्रकरणात पुढे काय घडते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
