फडणवीस वैफल्यग्रस्त; राज्याला सुसंस्कृत मुख्यमंत्र्याची गरज; संस्कार काढत राऊत गरजले

Sanjay Raut देवेंद्र फडणवीस एखाद्या सुलतानाप्रमाणे वागत आहेत. मोगल काळातील सुलतान जसे वागत होते, तशीच त्यांची वागणूक

Sanjay Raut Devendra Fadnavis

Sanjay Raut Devendra Fadnavis

महाराष्ट्राला एका सुसंस्कृत मुख्यमंत्र्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांचे संस्कार काय आहेत, हे गेल्या चार वर्षांत महाराष्ट्राने अनुभवले आहे. तुम्ही जनतेला ‘कुत्रे’ म्हणत आहात, ‘भाडोत्री तट्टू’ म्हणत आहात. मग याच कुत्र्यांना हाडे टाकून तुम्ही मते मिळवली का? आणि जे भाडोत्री तट्टू आहेत, त्यांना विकत घेऊन तुम्ही सत्तेवर आलात का? असा थेट हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर केला आहे.

फडणवीसांची वागणूक सुलतानाप्रमाणे

देवेंद्र फडणवीस एखाद्या सुलतानाप्रमाणे वागत आहेत. मोगल काळातील सुलतान जसे वागत होते, तशीच त्यांची वागणूक असल्याचे राऊत म्हणाले. फडणवीस यांनी महाराष्ट्रात एका प्रकारे आणीबाणी घोषित केली आहे. जनतेच्या पैशातून प्रकल्प उभारायचे, ते मूळ किमतीपेक्षा जास्त खर्चात पूर्ण करायचे, अशी त्यांची कार्यपद्धती आहे. हे प्रकल्प कोसळल्यानंतर जनता संताप व्यक्त करते, तेव्हा त्या जनतेलाच ‘भाडोत्री तट्टू’, ‘डॉग्स’, ‘कुत्रे’ अशा शब्दांत हिणवले जाते. हे फक्त सुलतानशाहीतच होऊ शकते. सुलतानासोबत बसलेले त्यांचे निजाम काल हसत होते आणि बाके वाजवत होते.

मोदी-शाहंनी महाराष्ट्राची सर्वाधिक बदनामी केली

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात ही बदनामशाही सुरू आहे. महाराष्ट्राची सर्वात मोठी बदनामी ज्यांनी केली, ते म्हणजे अमित शाह आणि नरेंद्र मोदी. महाराष्ट्रातील आमदार ५०-५० कोटी रुपयांना विकत घेतले गेले. ही काय महाराष्ट्राची बदनामी नाही का? ही महाराष्ट्राची परंपरा कधीच नव्हती. मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. ही काय राज्याची बदनामी नाही का? अशी किती उदाहरणे आम्ही द्यायची? असा सवालही राऊतांनी उपस्थित केला. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महात्मा फुले ते छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत अनेक बदनामीकारक वक्तव्ये केली. त्यावेळी तुम्ही त्यांचे समर्थन करत होतात. ही काय महाराष्ट्राची बदनामी नव्हती?

फडणवीसांना वैफल्य आले आहे

देवेंद्र फडणवीस यांना वैफल्य आले आहे. ते निराश झाले आहेत. त्यामुळे जोपर्यंत ते मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत त्यांचे एकच काम सुरू आहे—फावडे घेऊन बसायचे आणि ठेकेदारांकडून पैसे काढायचे. त्यांनी काल जनतेला ‘भाडोत्री तट्टू’, ‘कुत्रे’ असे संबोधले. एवढेच नव्हे, तर पत्रकारांचाही अपमान केला. राज्यात रोज खून, मारामाऱ्या होत आहेत. ही काय राज्याची बदनामी नाही का? विधानसभेत रोज खोटे बोलले जाते. ही काय राज्याची बदनामी नाही का?

विधानसभेत संविधानाच्या विरोधात निर्णय दिले जातात. ही काय राज्याची बदनामी नाही का? तुम्ही सरळ मार्गाने सत्तेवर आलेले नाही. हीदेखील महाराष्ट्राची बदनामी आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी. जनतेला ‘कुत्रे’ आणि ‘भाडोत्री तट्टू’ म्हणत त्यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेचा घोर अपमान केला आहे. हे त्यांच्या वैफल्याचे लक्षण असल्याचे राऊत म्हणाले.

Exit mobile version