मुंबई : हिंदुरक्षक छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsinh Koshyari) हे सातत्याने करतात तेव्हा भाजपच्या तोंडाला बूच लावलेले असते का, काश्मिरी पंडीत, काश्मिरमधील लोकं स्वतःच्या न्याय हक्कासाठी भांडत आहेत. त्यांना हक्क मिळवून देण्यासाठी भाजपवाले (BJP) कधी मोर्च्या काढणार आहेत, असा सवाल शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपस्थित केला.
भाजपच्या वतीने सोमवारी मुंबईत जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाबाबत खासदार संजय राऊत बोलत होते. संजय राऊत म्हणाले की, आज काढलेला मोर्चा हा काही हिंदूंचा मोर्चा नव्हता. मुळात तो भाजपचा मोर्चा होता. हिंदूंचा ठेका घेतलेल्या या देशात नरेंद्र मोदी यांचे जवळपास आठ वर्षांहून अधिक काळ सरकार आहे. मात्र, तरीही हिंदूंना मोर्चा काढावा लागत असेल तर मला वाटते हा मोर्चा मोदींच्याच विरोधातील मोर्चा आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमान करणाऱ्या भगतसिंह कोश्यारींच्या विरोधात भाजपवाले कधी जनआक्रोश मोर्चा काढणार आहेत. शिवाजी महाराज हे हिंदू नाहीत का, असा प्रश्न लोकं या मोर्चा काढणाऱ्या भाजपवाल्यांना विचारत आहेत, असे देखील संजय राऊत म्हणाले.
राऊत म्हणाले की, आज हजारो काश्मिरी पंडित जम्मू काश्मिरच्या रस्त्यावर आपल्या मागण्यांसाठी संघर्ष करत आहेत. केंद्रात बसलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांना त्या काश्मिरी पंडितांच्या मागण्या, आक्रोश दिसत नाही का, तो दिसण्यासाठी भाजपच्या वतीने जन आक्रोश मोर्चा कधी काढणार आहे, असा प्रश्न लोकं आता विचारू लागले आहेत.