राजकीय भांडणं करत राहू, पण… राऊतांनी पहिल्यांदा थोपटली सरनाईकांची पाठ…

Sanjay Raut Praises Pratap Sarnaik राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या वातावरणात राऊतांनी केलेलं सरनाईकांचं हे कौतुक चर्चेचा विषय ठरत आहे.

Sanjay Raut On Paratap Sarnaik

Sanjay Raut On Paratap Sarnaik

Sanjay Raut Praises Pratap Sarnaik First Time : रॅपिडो बाईक-टॅक्सीच्या मुद्द्यावरून राज्यातील रिक्षाचालकांमध्ये नाराजी असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे चक्क कौतुक केले आहे. रिक्षाचालकांच्या प्रश्नावर सरनाईक यांनी संवाद साधत त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला, असं राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या वातावरणात राऊतांनी केलेलं सरनाईकांचं हे कौतुक चर्चेचा विषय ठरत आहे.

रॅपिडो बाईक-टॅक्सीमुळे हजारो रिक्षाचालकांच्या रोजीरोटीवर संकट निर्माण होत असल्याचा दावा रिक्षाचालकांच्या संघटनांकडून करण्यात आला आहे. या प्रश्नावर रिक्षाचालकांच्या शिष्टमंडळाने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मंत्रालयात भेट घेतली. बैठकीनंतर रिक्षाचालकांनी सरनाईक आणि परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचं सांगितलं. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी सरनाईकांच्या भूमिकेचं कौतुक केलं. “परिवहन मंत्र्यांनी उत्तम काम केलं. त्यांनी संवाद साधला. त्यांनी रिक्षाचालकांच्या शिष्टमंडळाशी संवाद साधला,” असं राऊत म्हणाले.

राजकीय भांडणं करत राहू, पण सरनाईकांनी प्रश्न ऐकून घेतला

राऊत यांनी सरनाईक यांचं कौतुक करताना राजकारण आणि प्रशासनातील भूमिका वेगळी असल्याचंही स्पष्ट केलं. “राजकीय भांडणं आम्ही करत राहू. परंतु परिवहन मंत्री म्हणून त्यांनी रिक्षाचालकांचं प्रतिनिधी मंडळ ऐकून घेतलं आणि त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न केला,” असं त्यांनी म्हटलं. रिक्षाचालकांच्या प्रश्नाकडे सहानुभूतीने पाहण्याची गरज असल्याचंही राऊत यांनी सांगितलं. हजारो रिक्षाचालक आपल्या रोजीरोटीचा प्रश्न घेऊन मंत्र्यांकडे येतात. त्यामुळे त्यांचं म्हणणं समजून घेणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं.

राऊत गैरहजर, तरी सरनाईकांचं कौतुक

रिक्षाचालकांच्या शिष्टमंडळासोबतच्या भेटीत राऊत स्वतः उपस्थित राहू शकले नाहीत. आपण नागपूर दौऱ्यावर असल्याने भेटीचा निरोप उशिरा मिळाला, असं त्यांनी सांगितलं. मात्र, बैठकीनंतर रिक्षाचालकांचं शिष्टमंडळ आपल्यालाही भेटल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं. “मला नक्की जायला आवडलं असतं. थोडं मिसकम्युनिकेशन झालं. पण काल ज्या पद्धतीने हा प्रश्न राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हाताळला आणि त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, तो कौतुकास्पद आहे. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो,” असं राऊत म्हणाले.

प्रथमच रिक्षाचालकांचं शिष्टमंडळ समाधानी दिसलं

सरनाईक आणि परिवहन विभागाच्या भूमिकेमुळे रिक्षाचालकांच्या शिष्टमंडळाचं समाधान झाल्याचंही राऊत यांनी सांगितलं. “प्रथमच मी पाहिलं की रिक्षाचालकांचं शिष्टमंडळ समाधानी होतं,” असं ते म्हणाले. परिवहन मंत्री, परिवहन आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांनी रिक्षाचालकांचे प्रश्न योग्य पद्धतीने समजून घेतले आणि काही मागण्यांवर आदेशही दिल्याचं रिक्षाचालकांच्या संघटनांनी सांगितल्याचं राऊत यांनी नमूद केलं.

दरम्यान, राऊत यांनी सरनाईकांचं कौतुक केलं असलं तरी रॅपिडो बाईक-टॅक्सीचा मुद्दा संपलेला नाही. “रॅपिडो बाईक हा हजारो रिक्षाचालकांच्या रोजीरोटीवर आलेलं संकट आहे. हे संकट दूर करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत,” अशी स्पष्ट भूमिका राऊत यांनी घेतली. त्याचवेळी भविष्यात रिक्षाचालकांना पुन्हा अडचणी आल्यास आपण त्यांच्या प्रश्नावर नेतृत्व करू, असंही त्यांनी सांगितलं. एकीकडे रॅपिडोविरोधात रिक्षाचालकांचा आक्रमक पवित्रा, तर दुसरीकडे विरोधी पक्षातील संजय राऊतांकडून परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचं जाहीर कौतुक या राजकीय ‘यू-टर्न’मुळे या प्रकरणाला आता वेगळाच रंग आला आहे.

Exit mobile version