Download App

Sanjay Raut : राज्यात आता झुंडशाही, वारिसे हत्याकांडातील खरे सूत्रधार शोधा; संजय राऊत यांची मागणी

मुंबई – पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यू प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी विरोधी पक्षांनी टिकेची झोड उठविली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही शनिवारी पत्रकार परिषद घेत या मुद्द्यावर राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. ‘रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला विरोध होता. पत्रकार वारिसे यांची हत्या झाली. हे प्रकरण खूप गंभीर आहे. यामागील सूत्रधार सरकारला माहिती आहेत. गृहमंत्र्यांच्या सभेनंतर दुसऱ्याच दिवशी वारिसे यांची हत्या झाली, याचा अर्थ काय, हा योगायोग समजायचा का, असे प्रश्न उपस्थित करत आधी जे आपल्या विरोधातील बोलतील त्यांना ईडी आणि सीबीआयच्या फेऱ्यात अडकवले जात होते. आता या सरकारने आणखी एक पाऊल पुढे टाकले असून विरोधकांच्या हत्या होऊ लागल्या आहेत. झुंडशाही सुरू आहे,’ अशा शब्दांत राऊत यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. ‘मला देखील धमक्यांचे फोन आले. शशिकांत वारिसे यांचा मुद्दा उचललात तर तुमचा शशिकांत वारिसे करू,’ असे म्हटले जात असल्याचे राऊत यांनी सांगितले.

राऊत पुढे म्हणाले, की ‘वारिसे यांनी रिफायनरी येणार म्हणून ज्यांनी कवडेमोल किंमतीत जमिनी घेतल्या ते जमीनदार कोण आहेत या संदर्भातली माहिती देण्यास सुरुवात केली होती. रत्नागिरीतील काही राजकारणी रिफायनरी समर्थक यांचा या जमिनी घेण्यात कसा हातभार आहे, या संदर्भात त्यांनी लिहायला सुरुवात केली होती. त्यामुळे ते या भागातल्या राजकारण्यांच्या डोळ्यात खुपत होते. पालकमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांनी रिफायनरी आणणारच याची सुपारी घेतली होती. त्यानंतर त्यांची हत्या झाली. आता या प्रकरणात ज्या आरोपीला अटक झाली आहे, त्या आरोपीमागील खरे सूत्रधार कोण आहेत याचा शोध घ्यावा. मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षाला भेटण्याची वेळ मिळत नाही आहे. वारंवार वेळ मागूनही वेळ दिली जात नाही. म्हणून आम्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. आज आमचे नेते हे वारिसे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतील आणि पुढील भूमिका ठरविण्यात येईल,’ असे राऊत म्हणाले.

https://twitter.com/LetsUppMarathi

‘केंद्रीय उपमुख्यमंत्र्यांनी विशेष टीम येथे पाठवावे आणि वारीसे यांचीच नाही तर या आधी झालेल्या चार-पाच हत्यांचा देखील तपास करावा. रिफायनरी समर्थकांनी या ठिकाणी आसपास जमिनी घेतलेल्या आहेत या जमिनी कोणाच्या आहेत याची यादी आम्ही लवकरच जाहीर करणार आहोत. पोलिसांवर दबाव आहे. शशिकांत वारीसे यांच्या कुटुंबीयांना तात्काळ ५० लाखांची मदत द्यावी’ असे आवाहन मी उपमुख्यमंत्र्यांना केल्याचे राऊत यांनी सांगितले.

 

Tags

follow us