कणकवली : ‘उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हेच शिवसेनाप्रमुख म्हणून कायम राहतील. तेच आमचे सेनापती आहेत. बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच त्यांना पक्षप्रमुख म्हणून नियुक्त केले होते. त्यावर आम्ही सर्वांनी शिक्कामोर्तब केले. निवडणूक आयोग (Election Commission) काय दुसरे कुणीही हे ठरवणार नाही. शिवसेनेच्या (Shivsena) शाखा व शिवसेनाभवनावरील शिवसेनेचे नावही तसच राहिल. निवडणूक आयोगाने शेण खाल्ले म्हणून आमच्या शाखा त्या दिशेने जाणार नाहीत. शाखा व शिवसैनिक तिथेच बसतील. खुर्च्यांवर लोक बसवून त्यांच्याकडून निर्णय लिहून घेतला तरी पक्ष कुठेही जात नाही,’ अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री शिंदे गटाला ललकारले.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. या घडामोडींनंतर शनिवारी सकाळी खासदार राऊत यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व भाजपवर (BJP) सडकून टीका केली.
हे वाचा : Sanjay Raut : पाळीव कुत्र्याने भाकरी पळवल्याने कुत्रा मालक होत नाही
राऊत पुढे म्हणाले, की ‘घटनात्मक पदांवर कळसुत्री बाहुले बसवून त्यांच्याकडून हवे तसे निर्णय मिळवता ही कुठली लोकशाही ? आता तर लोकशाहीचे अस्तित्वच राहिलेले नाही. हा निर्णय झाला असला तरी फिनिक्स पक्षी ज्याप्रमाणे राखेतून पुन्हा झेप घेतो त्याच पद्धतीने शिवसेनाही पुन्हा झेप घेणार हे निश्चित.आमदारांना व्हीप बजावण्याचा मुद्दा हा तांत्रिक मुद्दा आहे त्यावर मी आताच काही बोलणार नाही. मात्र, आमच्यावर कोणताही दबाव आम्ही सहन करणार नाही. शिवसेना असा दबाव झुगारून आणि तुडवून उभी राहिली आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे,’असा इशारा राऊत यांनी दिला.
‘कुंपणावर बसलेल्यांनी उड्या माराव्यात यासाठीच हा निर्णय घेतला गेला. ज्यांना उड्या मारायच्या होत्या त्यांनी आधीच मारल्या आहेत. त्यांनी जरी उड्या मारल्या असल्या तरी ते उड्या मारणार आहेत ते म्हणजे शिवसेना नाही. जमिनीवर जी शिवसेना आहे त्यामुळे हे लोक आमदार, खासदार झाले याचा विचार आयोगाने केला नाही. त्यांनी फक्त मतांच्या संख्येच्या आधारावर निर्णय दिला. असा कुठे निर्णय घेतात का ?, कोणत्या घटनेत असे लिहिलेले आहे ?, या अशा निर्णयाचे स्वागत केले जाते ?, कुठे आहे लोकशाही ?, असे प्रश्न राऊत यांनी उपस्थित केले.
खासदारांच्या प्रश्नाला बगल
पत्रकार परिषदेदरम्यान पत्रकारांनी राऊत यांना खासदारांच्या शपथपत्राबाबत प्रश्न केला. या प्रश्नावर राऊत यांनी जास्त बोलणे टाळले. ते म्हणाले, की ‘अनिल देसाई यांनी खासदारांचा दावा फेटाळला आहे. सर्व खासदारांची शपथपत्रे दिली गेली आहेत. यावर ज्यांनी कामकाज पाहिले त्यांच्याशीच बोला’ असे राऊत म्हणाले.