संभाजीनगर : औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर नामांतर वाद थांबायचे काही नाव घेईना. रोज आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच एमआयएमचे खासदार यांनी या नामांतराविरोधात उपोषण सुरु केले आहे. त्यावर एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी आंदोलनादरम्यान औरंगजेब यांचे फोटो उंचावल्याने इम्तियाज जलील (Imtiyaj Jalil) यांच्यावर गंभीर आरोप केले. त्या आरोपांना प्रतिउत्तर देताना इम्तियाज जलील यांनी म्हटले की, औरंगजेब आणि आमचा काहीही संबंध नाही. त्याच्याशी काही देणंघेणं नाही. पण शिवसैनिकांना पंतप्रधानांची गरज लागते, हे असले कसले शिवसैनिक म्हणत आमदार प्रदीप जैस्वाल (Pradeep Jaiswal) आणि संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यावर सडकून टीका केली.
खासदार इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांच्यावर टीका करताना हे असले कसले शिवसैनिक आहेत. यांना पंतप्रधानांची गरज भासते. तुमची राज्यात सत्ता आहे ना, मग मला कशाला बोलतो बाबा, तुम्ही इतके मोठे नेते आहात तर मग तुम्हाला परवानगीची गरज का लागते. तुम्ही तर शिवसैनिक आहात. तर शिवसैनिकांनी कधी कोणाची परवानगी घेतली होती का, तुमचे जे बाळासाहेब ठाकरे होते त्यांनी कधी कोणाची परवानगी घेतलीय का, असे म्हणत इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली.
आताचे शिवसैनिक इतके कमजोर झाले आहेत की त्यांना थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मदत घ्यावी लागत आहे. बाळासाहेब ठाकरे यांना कधीच पंतप्रधानांना पत्र लिहण्याची गरज पडली नाही, असे सांगत शिवसैनिकांना मदतीची गरज पडते का, तर बाळासाहेब ठाकरे यांची अशी शिवसेना होती का, असा सवाल उपस्थित करत आमदार संजय शिरसाट आणि प्रदीप जैस्वाल यांच्यावर खासदार इम्तियाज जलील यांनी सडकून टीका केली.