Download App

संतोष देशमुखांचा भाऊ धनंजयने घेतली पोलिसांची भेट; तपासाबाबत ‘सीआयडी’ने दिला महत्वाचा शब्द

धनंजय देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एक फौजदारी रीट याचिकाही दाखल केली आहे. ॲडव्होकेट शोमितकुमार

  • Written By: Last Updated:

Santosh Deshmukh Case :  सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामुळे सध्या राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी या प्रकरणाचा तपास करत असलेल्या सीआयडी पथकातील अधिकाऱ्यांची भेट घेतली. तपासाचा आढावा घेण्यासाठी धनंजय देशमुख यांनी ही भेट घेतल्याचे समजतं.

तुम्ही सरपंच हत्या अन् जंगलराजवरचा फोकस वळवू नका; सुरेश धसांनी ;प्राजक्ताचा विषय संपवला

या भेटीनंतर धनंजय देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसांत सर्व आरोपींना अटक करु, असे आश्वासन दिल्याचे धनंजय देशमुख यांनी सांगितले. यावेळी प्रसारमाध्यमांनी धनंजय देशमुख यांना वाल्मिक कराड याच्या मोबाईल लोकेशनबाबत (सीडीआर) विचारणा केली. त्यावर मी उद्या सविस्तर बोलेन, असंही ते म्हणाले.

धनंजय देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एक फौजदारी रीट याचिकाही दाखल केली आहे. ॲडव्होकेट शोमितकुमार सोळंके यांच्यामार्फत ही याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराडला सहआरोपी करु तपास व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटचा सहकारी आहे. त्यामुळे हा तपास नि:पक्ष होण्यासाठी या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रि‍पदापासून दूर ठेवण्याचे आदेश द्यावेत असंही त्यामध्ये म्हटलं आहे.

संबंधित याचिकेत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे कशाप्रकारे घनिष्ट संबंध होते, हेदेखील सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या मैत्रीचा दाखला देणारी तब्बल 150 छायाचित्रं समाजमाध्यमांवर उपलब्ध आहेत. याशिवाय, विधिमंडळातील काही भाषणांचा दाखला देत धनंजय देशमुख यांनी कराड-मुंडे यांच्यातील हितसंबंध अधोरेखित केले आहेत.

गुन्हे असतानाही शस्त्रपरवाना

संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास सुरु झाल्यानंतर वाल्मिक कराड यांच्यावरील गुन्ह्यांचा मुद्दा नव्याने उपस्थित झाला आहे. वाल्मिक कराड यांच्यावर जवळपास 26 गुन्हे दाखल असून यापैकी 15 गुन्हे गंभीर स्वरुपाचे असल्याची माहिती आहे. तरीही वाल्मिक कराड यांच्याकडे शस्त्रपरवाना कायम असल्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एवढेच नव्हे त्यांच्या दिमतीसाठी दोन पोलीस बॉडीगार्डही होते.

ऑक्टोबर 2024 मध्ये तत्कालीन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी गुन्हे दाखल असलेल्या 245 जणांची यादी जिल्हाधिकाऱ्यांना दिली होती. यामध्ये वाल्मिक कराड यांच्या नावाचाही समावेश होता. दरम्यान, वाल्मिक कराड यांच्यावर आता नव्याने आवदा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे.

follow us