Santosh Deshmukh Murder Case : बीड जिल्ह्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड सध्या बीड कारागृहात आहे. अशात या कारागृहात घडलेला एक अत्यंत धक्कादायक (Deshmukh) प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे बीडमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. इतकंच नाही तर या गंभीर प्रकारामुळे दोन अधिकाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड बीड कारागृहात असून, त्याच तुरुंगातील वरिष्ठ अधिकारी डी. डी. कवाळे आणि महिला शिपाई सीमा गोरे यांच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रक्ताच्या नातेवाईकांव्यतिरिक्त इतर लोकांना कैद्यांशी भेटण्यास परवानगी दिल्याचा प्रकार समोर आल्यानंतर ही कठोर पावले उचलण्यात आली आहेत.
मोठी बातमी! वाल्मिक कराडला तुरुंगात पॅनिक अटॅक; डॉक्टरांकडून तपासणी
कारागृह महासंचालक कार्यालयाच्या पथकाने बीड कारागृहाची तपासणी केली असता, अनेक नियमभंग आणि त्रुटी उघडकीस आल्या होत्या. दीड महिन्यांपूर्वी डी. डी. कवाळे यांच्याकडे तात्पुरता कारागृहाचा कार्यभार देण्यात आला होता. तपासणीत विविध असंगती आढळल्याने पुणे येथील अपर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, गेल्या अनेक वर्षांपासून कारागृह अधिकाऱ्यांवर अशी मोठी कारवाई झालेली नव्हती, त्यामुळे यावेळची कारवाई अधिकच चर्चेत आली आहे.
यावर उठले प्रश्न
गेल्या काही काळात वाल्मिक कराडला तुरुंगात विशेष वागणूक दिली जात असल्याचे आरोप होत होते. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निलंबन होताच, आता प्रश्न उपस्थित होत आहे की, नातेवाईकांव्यतिरिक्त इतरांनाही भेटीची परवानगी दिलेला कैदी नेमका कोण होता? या प्रश्नावरून सध्या बीड जिल्ह्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
भाजपचे आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना वेगवेगळ्या तुरुंगात ठेवण्याची मागणी केली आहे. त्यांनी बीड तुरुंग प्रशासनाच्या कामकाजाबाबत गंभीर तक्रारी केल्या असून, लवकरच पुराव्यानिशी मोठी तक्रार दाखल करू, असेही स्पष्ट केले आहे. आरोपींना एका ठिकाणी ठेवू नये यासाठी प्रयत्न सुरू असल्याने आता बीड कारागृहातील स्थितीवर आणि येणाऱ्या काळात होणाऱ्या कारवाईवर सर्वांचे लक्ष लागले आहे.