महायुतीतील अंतर्गत संघर्षाचा फटका (Gokul) गोकुळला बसत असल्याचा आरोप सत्ताधारी आघाडीचे नेते सतेज पाटील यांनी केला आहे. गोकुळच्या कारभारावरून महायुतीत सुरू असलेल्या वादामुळे दररोज कोर्टाच्या पायऱ्या चढण्याची वेळ डेअरीवर आली असल्याची टीका त्यांनी केली. गोकुळ, जिल्हा परिषद आणि इचलकरंजी महापालिकेतील महायुतीमधील अंतर्गत संघर्ष पाहता दूध उत्पादक यावेळी शहाणपणाचा निर्णय घेतील आणि एकमुखाने आमच्या बाजूने राहतील, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.
गोकुळच्या निवडणुकीवरून खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या 25-0 विजयाच्या दाव्याचीही पाटील यांनी खिल्ली उडवली. महापालिका निवडणुकीबाबतही महाडिक यांनी केलेल्या अंदाजाची आठवण करून देत, त्यांनी चार-पाच नगरसेवक निवडून येतील असं म्हटलं होतं, असा टोला पाटील यांनी लगावला. त्यामुळे गोकुळच्या निकालाबाबत केलेल्या दाव्यांवरून दोन्ही बाजूंमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
बंटी पाटील अन् महाडिकांमध्ये पुन्हा रंगणार कुस्ती; धोबीपछाड कोण देणार याची उत्सुकता
शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून सतेज पाटील यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांनाही लक्ष्य केलं. क्षीरसागर यांना मंत्री होण्याची घाई झाली असून, आबिटकर यांना बाजूला करून मंत्रिपद मिळवण्याच्या उद्देशाने ते सरकारची बाजू आक्रमकपणे मांडत असल्याचा आरोप पाटील यांनी केला. शक्तीपीठ हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा प्रश्न असल्याने क्षीरसागर यांनी आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके आणि कोरे यांच्याकडून सरकारची भूमिका मांडून घ्यावी आणि त्यानंतर शक्तीपीठाच्या समर्थनात बोलावं, असा सल्लाही त्यांनी दिला.
शक्तीपीठ प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही सतेज पाटील यांनी दिला. या प्रकल्पामुळे नेमकं काय नुकसान होणार आहे, हे सरकारने जनतेसमोर स्पष्ट करावं, असं आव्हान त्यांनी दिलं. एकनाथ शिंदे यांनी शक्तीपीठ रद्द करण्याची भूमिका घेतली होती, ती खरी की खोटी, असा सवाल करत पाटील यांनी सरकारला घेरलं. निवडणुकीपूर्वी आश्वासनं देऊन मतं मिळवली जातात आणि नंतर जनतेला बाजूला केलं जातं, असा आरोप करत 12 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना सोबत घेऊन शक्तीपीठ रद्द करण्यासाठी संघर्ष करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
