Satyajit Tambe Meets Chandrakant Patil : आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची सिंहगड या त्यांच्या शासकीय निवासस्थानी आज भेट घेतली आहे. यावेळी, राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. येत्या मंगळवारी ( दि. 16 मे ) रोजी संबंधित अधिकाऱ्यांसह एका बैठकीचेदेखील आयोजन करण्यात आले आहे.
राज्याच्या तंत्रशिक्षण खात्याअंतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय अनुदानित खासगी संस्थांच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 100 टक्के वेतन देण्यात यावे, तसेच सर्व सहसंचालक कार्यालयांमध्ये ऑनलाईन नोंदणी व ट्रॅकींग सिस्टीम ( online file tracking system ) लागू करण्यात यावी. यासोबतच अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक संवर्गाच्या शारीरिक शिक्षण संचालक व ग्रंथपाल पदांची भरती प्रक्रिया तातडीने सुरु करण्यात यावी. यासह तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत या भेटीदरम्यान सविस्तर चर्चा झाली.
याशिवाय, राज्यातील 24 नोव्हेंबर 2001 पूर्वीच्या शिक्षणशास्त्र (बी.एड.) महाविद्यालयांना महाराष्ट्र शासनाकडून अनुदान मिळावा यासाठी विनाअनुदानित शिक्षणशास्त्र महाविद्यालय प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी असोसिएशनच्या वतीने मुंबईच्या आझाद मैदान येथे सुरु असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला बसलेल्या आंदोलकांची आमदार सत्यजीत तांबे यांनी मंगळवारी भेट घेतली होती. आजच्या भेटीदरम्यान याविषयीदेखील सकारात्मक चर्चा करण्यात आलेली आहे.