पुणे : बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास 15 गावांमध्ये अनेकांच्या डोक्यावरचे केस अचानक का गळू लागले होते, याचे वैज्ञानिक कारण अखेर समोर आले आहे. ज्यांच्या डोक्यावरचे केस गळत आहेत, त्यांच्या शरीरात सेलेनियमचे प्रमाण दहापट जास्त आढळले; तर शरीरातील रक्ताच्या नमुन्यात आवश्यक असणाऱ्या झिंकचे प्रमाण एकदम कमी झाल्यामुळे हा प्रकार घडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. (Scientific reason revealed why many people suddenly started losing hair in 15 villages of Buldhana district)
या गावांमधील केसगळतीचे कारण शोधण्यासाठी केंद्र सरकारपासून अनेक एजन्सीज तेथे गेल्या. तपासण्या झाल्या. मात्र नेमके काय घडले, हे कोणीही सांगायला तयार नाही. अशात विंचूदंशावर औषध शोधणारे डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी स्वत: त्यांच्या टीमसह या भागाला भेट दिली. स्व खर्चाने या भागातील धान्य, राख, माती, कोळसा, नदीचे, अंघोळीचे आणि पिण्याचे पाणी तपासण्यासाठी घेतले होते. मुंबईतील एजीलस फडके लॅबमध्ये या तपासण्या केल्या. त्यातून आलेले निष्कर्ष धक्कादायक आहेत.
डॉ. बावस्कर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, ‘मी व माझ्या टीमने बोंदगाव, मच्छिंद्रखेड आदी गावांत भेट दिली. केसगळती व टक्कल पडण्यामागे लोकांच्या शरीरात सेलेनियमचे वाढलेले आणि झिंकचे कमी झालेले प्रमाण हे मुख्य कारण आहे. रेशन दुकानात मिळणाऱ्या गव्हात सेलेनियम वाढल्याची माहिती आयसीएमआर संस्थेने दिली. ते कुठून वाढले हा प्रश्न सुटलेला नाही, असेही ते म्हणाले.
तर एजीलस फडके लॅबचे अध्यक्ष डॉ. अविनाश फडके यांना विचारले असता ते म्हणाले, शरीरात प्रतिलीटर किती मायक्रोग्रॅम सेलेनियम असावे याचे काही निकष आहेत. यासाठी पार्किंग एल्मर इक्विपमेंट पद्धतीनुसार तपासणी करण्यात आली होती. काही रुग्णांच्या शरीरात हे प्रमाण 4 ते 5 हजार मायक्रोग्रम आढळून आले आहे. हे अत्यंत गंभीर आहे.
सरकारने तातडीने हस्तक्षेप केला पाहिजे. सेलेनियमचे एवढे प्रमाण आले कुठून, हे युद्धपातळीवर शोधले पाहिजे. आत्तापर्यंत अडीचशे रुग्ण समोर आले आहेत. रुग्ण दगावणार नाही. पण मुलींना मोठा धक्का बसला आहे. मुलींना केस गळल्यामुळे लग्न करण्यात अडचणी येत आहेत, अशीही मागणी आता जोर धरू लागली आहे.