Download App

Amravati Graduate Constituency : भाजपला दुसरा धक्काही ‘जोर से’ : रणजीत पाटील पराभूत, लिंगाडे सव्वाशेर

अमरावतीः मागील 31 तासांपासून सुरू असलेली अमरावती पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी अखेर पूर्ण झाली आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे (Dhiraj Lingade) यांचा विजय झाला आहे. त्यांनी भाजपचे रणजित पाटील (Ranjitpatil) यांना मात दिली आहे. धीरज लिंगाडे यांच्या विजयामुळे अमरावती विभागात भाजपला मोठा धक्का बसला आहे.

3 हजार 382 मतांनी महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे विजयी झाले आहेत. धीरज लिंगाडे यांना 46 हजार 344 मते मिळाली आहेत. तर डॉ. रणजित पाटील यांना 42 हजार 963 मते मिळाली आहेत.

मतमोजणीवेळी भाजपचे उमेदवार डॉ. रणजीत पाटील यांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती. पाटील यांच्या मागणीनंतर निवडणूक आयोगाने त्यांची मागणी मान्य करीत फेर मतमोजणी सुरु केली होती.

या मतदारसंघात विजयी होण्यासाठी उमेदवाराला 47 हजार 101 मतांचा कोटा होता. मतमोजणीच्या अखेरीपर्यंत एकही उमेदवाराने कोटा पूर्ण न केल्याने धीरज लिंगाडे यांना विजयी घोषित करण्यात आले आहे.

दरम्यान, रणजित पाटील यांच्या प्रतिनिधीने मतमोजणीच्यावेळी काही संशयास्पद मतपत्रिका असल्याचा दावा केल्याने पाटील यांच्या प्रतिनिधीकडून फेरमतमोजणीची मागणी करण्यात आली होती.

मात्र, ही फेर मतमोजणीची मागणी डॉ. रणजीत पाटील यांच्या अंगाशी आल्याचं फेरतपासणीनंतर समोर आलं आहे. कारण एकूण 8 हजार अवैध मतांपैकी धीरज लिंगाडे यांना केवळ 32 मते मिळाली होती. लिंगाडे यांची ही 32 अवैध मते बाद ठरली आहेत.

तर रणजित पाटील यांना या 8 हजार अवैध मतांपैकी 4500 ते 5000 अवैध मते मिळाली. त्यामुळे पाटील यांची ही अवैध मते बाद करण्यात आली आहे. या निकालामध्ये एकूण 1 लाख 2 हजार 587 मतांपैकी एकूण 8 हजार 735 मते अवैध ठरल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान, भाजपसाठी ही निवडणुक प्रतिष्ठेची मानली जात होती. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे साऱ्यांचचं लक्ष लागून राहिलं होतं. अखरे महाविकास आघाडीने भाजपच्या उमदेवाराला धूळ चारल्याने भाजपची अमरावतीत नामुष्की झाल्याची परिस्थिती निर्माण झालीय.

Tags

follow us