फेसबुकवरून ओळख वाढवून लॉजमध्ये नेले, मादक पदार्थ देत अत्याचार; पुण्यात स्वयंघोषित धर्मगुरू जेरबंद

महादेवाचा अवतार असल्याचा दावा करत महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

Untitled Design 111

Untitled Design 111

Self-proclaimed religious leader arrested in Pune : राज्यात नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने संतापाची लाट उसळलेली असतानाच आता पुण्यातून देखील अशाच प्रकारचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्वतःला महादेवाचा अवतार असल्याचा दावा करत एका महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी परिसरातून ही कारवाई करण्यात आली असून या घटनेमुळे पुन्हा एकदा अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची सुरूवात वसई येथे झाली होती. तेथील तक्रार पुढील तपासासाठी पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांना आरोपी ऋषिकेश वैद्य पुण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत पिंपरी भागातून त्याला ताब्यात घेतले. तो आपल्या नातेवाईकांकडे जाण्यासाठी गाडीतून प्रवास करत असताना पोलिसांनी त्याला अटक केली. गेल्या काही दिवसांपासून पुणे पोलिसांच्या तीन ते चार पथकांकडून त्याचा शोध सुरू होता. अटकेनंतर उद्या दुपारी त्याला शिवाजीनगर न्यायालयात हजर केले जाणार आहे.

संसारातील अडचणी दूर व्हाव्यात म्हणून जोडपं खरातकडं गेलं आणि नको ते होऊन बसलं, आणखी एक गुन्हा दाखल

पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा आरोपीशी पहिला संपर्क 2023 मध्ये फेसबुकच्या माध्यमातून झाला होता. त्यानंतर डिसेंबर 2023 मध्ये आरोपी पुण्यात येऊन तिला भेटला. यावेळी त्याने स्वतःला महादेवाचा अवतार असल्याचे सांगितले आणि तीच पार्वती असल्याचा दावा करत तिचा विश्वास संपादन केला. पीडितेच्या तक्रारीनुसार, आरोपी तिला पुण्यातील मांजरी परिसरातील एका लॉजमध्ये घेऊन गेला, तिला मादक पदार्थ दिले आणि तिच्यावर अत्याचार केला. याशिवाय तिचे फोटो काढून ब्लॅकमेल करण्याचा देखील प्रयत्न केल्याचे आरोप आहेत. याप्रकरणी मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या पोलीस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात देखील रोज नवे खुलासे समोर येत आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यात लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीचा समावेश आहे. एका प्रकरणात खरातने स्वतःला दैवी शक्ती असल्याचे भासवून तांब्याच्या भांड्यातील पाणी पाजत महिलेवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. संसारातील अडचणी दूर करण्यासाठी आलेल्या दाम्पत्याचा विश्वास संपादन करून त्याने हा प्रकार केल्याचा आरोप आहे.

या दोन्ही घटनांमुळे राज्यात भोंदूगिरी आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणूक व अत्याचाराच्या घटनांमध्ये गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी अशा स्वयंघोषित बाबांपासून सावध राहण्याचे आवाहन देखील यानिमित्ताने करण्यात येत आहे.

Exit mobile version