RTI च्या आरोपांवरून गायकवाड भडकले; महालेंवर वादग्रस्त शब्दांत टीका, चिखलीत राजकीय वातावरण ढवळून निघाले
राजकीय वातावरण तापले आहे. संजय गायकवाड आणि श्वेता महाले यांच्यातील आरोप-प्रत्यारोप आता उघडपणे समोर येऊ लागले आहेत.
Sanjay Gaikwad’s controversial criticism of Shweta Mahale : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात सध्या महायुतीमधील अंतर्गत वाद चांगलाच चिघळला असून, राजकीय वातावरण तापले आहे. संजय गायकवाड आणि श्वेता महाले यांच्यातील आरोप-प्रत्यारोप आता उघडपणे समोर येऊ लागले आहेत. शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी भाजप आमदार श्वेता महाले यांच्यावर अत्यंत आक्रमक आणि वादग्रस्त शब्दांत टीका केली आहे. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद आता चव्हाट्यावर आले असून, दोन्ही नेत्यांमधील शाब्दिक युद्ध अधिक तीव्र होताना दिसत आहे.
नेमकं प्रकरण काय?
चिखली मतदारसंघात पक्षवाढीच्या पार्श्वभूमीवर वादाला सुरुवात झाली. श्वेता महाले यांनी आरोप केला होता की, संजय गायकवाड हे माहिती अधिकाराचा (RTI) वापर करून सरपंचांवर दबाव टाकत आहेत आणि त्यांना शिवसेनेत प्रवेश करण्यास भाग पाडत आहेत. या आरोपांना उत्तर देताना गायकवाड यांनी आक्रमक भूमिका घेत महालेंवर जोरदार पलटवार केला. आमचं काम सरळ आहे, छातीला छाती भिडवायची आणि विषय संपवायचा. पाठीत खंजीर खुपसणं आम्हाला जमत नाही. RTI चा वापर करून दबाव टाकण्याचे हिXX धंदे मी करत नाही. हे कोण करतंय, याची चौकशी तुम्ही तुमच्या घरात करा, अशा कठोर शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया दिली.
कार्यकर्त्यांवर दबावाचा आरोप
गायकवाड यांनी पुढे असा दावा केला की, चिखलीत त्यांच्या समर्थकांना आणि नातेवाईकांना धमकावलं जात आहे. माझ्याबद्दल चांगल्या पोस्ट केल्यावरही लोकांना धमक्या दिल्या जातात. आमचे कार्यकर्ते कामासाठी गेले की त्यांना ‘पक्षात प्रवेश घ्या’ असं सांगितलं जातं, असा आरोप त्यांनी केला. तसेच, आमच्या शिवसैनिकांनी भाजप आमदारांना अनेक वेळा निवडून आणलं आहे. आता जर शिवसेना संपवण्याचा प्रयत्न होत असेल, तर त्याला उत्तर देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असा इशाराही त्यांनी दिला.
रूबल अग्रवालांना कोकण विभागीय आयुक्तपद; फडणवीसांचा ‘मास्टरस्ट्रोक’
जेलमध्ये टाकण्याच्या धमकीवरून आव्हान
वाद इथेच थांबला नाही. गायकवाड यांनी थेट आव्हान देत म्हटलं, कोणाला जेलमध्ये घालणार आणि कोणाला धमकावणार, हे आम्हीही पाहणार आहोत. चिखलीच्या आमदार काय करतात, हे आम्हाला माहिती आहे. मी घरात बसणारा आमदार नाही, संपूर्ण महाराष्ट्रात माझं नाव आहे.
महायुतीतील वाढता तणाव
या प्रकरणामुळे महायुतीमधील अंतर्गत मतभेद उघड झाले असून, स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणे बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चिखली मतदारसंघातील हा वाद पुढे कोणत्या वळणावर जातो, याकडे आता राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.