विरोधकांचा दबाव आणि पक्षांतर्गत नाराजी वाढली, अखेर रुपाली चाकणकरांनी सोडली दोन्ही पदे

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 106

Rupali Chakankar left both posts : अशोक खरात प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, या प्रकरणात अडचणीत आलेल्या रुपाली चाकणकर यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला आहे. खरात यांना आपले गुरू मानणाऱ्या चाकणकर यांच्यावर विरोधकांसह पक्षांतर्गत गटांकडूनही दबाव वाढत होता. अखेर वाढत्या टीकेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पदाचा त्याग केला. या संपूर्ण प्रकरणात निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी व्हावी, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे.

काय म्हणाल्या रुपाली चाकणकर?

रुपाली चाकणकर यांनी सांगितले की, अशोक खरात प्रकरणात आपली भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली आहे. कोणत्याही आर्थिक व्यवहारात किंवा गैरकृत्यात आपला दूरान्वयेही संबंध नसल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले. पोलीस तपासातून सत्य बाहेर येईल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांकडे निष्पक्ष चौकशीची मागणी केल्याचे सांगितले.

प्रकरण नेमकं काय?

अशोक खरात यांच्यावर शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे गंभीर आरोप आहेत. या प्रकरणात कारवाई सुरू असतानाच खरात आणि रुपाली चाकणकर यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्यामुळे वाद अधिक चिघळला. खरात यांना गुरू मानत असल्यामुळे, यापूर्वी काही प्रकरणांमध्ये चाकणकर यांनी हस्तक्षेप केल्याचेही आरोप झाले.

श्रीपाद छिंदम यांना भर महासभेतून नगरसेवकांनी बाहेर काढले; महापालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत नाट्यमय घडामोडी

राजकीय दबाव आणि राजीनामे

या प्रकरणावरून विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेत चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांनीही त्यांना पद सोडण्याचा सल्ला दिल्याची माहिती समोर आली. या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रथम राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही त्याग केला.

अडचणी वाढण्याची शक्यता

रुपाली चाकणकर या खरात यांच्या ‘शिवनिका’ ट्रस्टच्या संचालिका असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात दोषींना कोणतीही सूट दिली जाणार नाही, असा इशारा दिला आहे. शिवनिका ट्रस्टच्या संचालकांचीही चौकशी केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून, यामध्ये चाकणकर यांच्यावरही तपासाची शक्यता व्यक्त केली जात आहे. या सर्व घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहेत.

follow us