Senior NCP leader Shantilal Suratwala passes away : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने राज्य शोकसागरात असतानाच, पुण्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातून आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांतीलाल सुरतवाला यांचे आज पहाटे निधन झाले. वयाच्या 76 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून ते कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होते. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
शांतीलाल सुरतवाला यांची ओळख केवळ राजकारणी म्हणून मर्यादित नव्हती. ते एक संवेदनशील सामाजिक कार्यकर्ते, कल्पक प्रशासक आणि विकासाभिमुख नेता म्हणून ओळखले जात. त्यांच्या निधनाने पुणे शहराच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचा राजकीय प्रवास 1979 साली पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीपासून सुरू झाला. सिटी पोस्ट वॉर्डमधून त्यांनी पहिली निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. 1979 ते 2007 या प्रदीर्घ काळात त्यांनी नगरसेवक आणि महापौर म्हणून पुणेकरांची निष्ठेने सेवा केली.
शरद पवारांचे निकटवर्तीय
शांतीलाल सुरतवाला हे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि सुरेश कलमाडी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात. स्वतःहून कधीही पदाची अपेक्षा न करणाऱ्या सुरतवाला यांच्यावर शरद पवारांनी विश्वास दाखवत महापौरपदाची जबाबदारी सोपवली होती. ते आनंद ऋषीजी ब्लड बँकचे संस्थापक होते. तसेच गणेश मंडळ चळवळीत सक्रिय कार्यकर्ते म्हणूनही शहरात त्यांचा मोठा दरारा होता.
केंद्रीय आर्थिक पाहणी अहवालानुसार महाराष्ट्रात महसुली तूट; लाडकी बहीण’सारख्या योजनांवर अप्रत्यक्ष ताशेरे
‘रस्ते धुण्याची योजना’ – कल्पक महापौरांची ओळख
महापौरपदाच्या कार्यकाळात सुरतवाला यांनी पुण्याच्या विकासासाठी अनेक अभिनव संकल्पना मांडल्या. त्यातील सर्वाधिक चर्चेत राहिलेली कल्पना म्हणजे शहरातील प्रमुख रस्ते धुण्याची योजना. कात्रज तलावाच्या पाण्याचा वापर करून शहरातील 12 प्रमुख रस्ते धुणे, त्याआधी रस्त्यांवरील खड्डे बुजवणे आणि प्रदूषण कमी करत वाहतूक कोंडी सोडवणे, असा त्यांचा दूरदृष्टीपूर्ण मानस होता.
पुणे शहरात हळहळ
अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात आधीच कडकडीत बंद आणि राजकीय दुखवटा पाळला जात असताना, शांतीलाल सुरतवाला यांच्या जाण्याने पुणेकरांवर दुहेरी दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एक संयमी, अभ्यासू आणि विकासकामे तडीस नेणारा नेता हरपल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. पुणे शहराने आज एक अनुभवी मार्गदर्शक आणि निस्वार्थ सेवक गमावला आहे.
