समतेचा संदेश देणाऱ्या वारकरी संप्रदायात घुसखोरीचा आरोप; शरद पवार विरुद्ध भाजप, वारकरी संप्रदाय आक्रमक

पवारांवर जोरदार टीका करत म्हटले की, वारकरी संप्रदाय आणि हिंदू धर्माचा द्वेष करणाऱ्यांना आता हा संप्रदाय धर्मांध वाटू लागला आहे.

Untitled Design 70

Untitled Design 70

Sharad Pawar against BJP, Warkari sect aggressive : राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद पेटला आहे. महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या आखिल भारतीय साहित्य संमेलनात त्यांनी म्हटले की, समतेचा संदेश देणाऱ्या वारकरी संप्रदायातील प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी होत असून, सुमारे 60 टक्के लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारी असल्याचे दिसून येते. यासोबतच प्रबोधनाच्या या प्रवाहात महिलांचा अभाव असल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली.

या वक्तव्यावरून भाजप आक्रमक झाली आहे. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी पवारांवर जोरदार टीका करत म्हटले की, वारकरी संप्रदाय आणि हिंदू धर्माचा द्वेष करणाऱ्यांना आता हा संप्रदाय धर्मांध वाटू लागला आहे. राम कृष्ण हरी आणि ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत सामाजिक समतेचा संदेश देणाऱ्या संप्रदायाला धर्मांध म्हणणे चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, वारकरी संप्रदायाला हिंदू धर्मापासून दूर करण्याचे कारस्थान होत असल्याचा आरोप करत, असे प्रयत्न हणून पाडण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी देखील प्रतिक्रिया देताना सांगितले की, वारकरी संप्रदायात धर्मांध शक्ती नसून उलट समाजप्रबोधनाला महत्व दिले जाते. काही अर्बन नक्षल प्रवृत्ती घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आणि याबाबत सखोल तपास व्हावा, अशी मागणी केली. विठ्ठलभक्तीला धर्मांधता म्हणणं चुकीचं असल्याचंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान विश्व वारकरी सेनेकडून देखील पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यात आला. ह. भ. प. गणेश महाराज शेटे यांनी सांगितले की, वारकरी संप्रदायाने नेहमीच अंधश्रद्धा निर्मूलन आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला आहे.

मात्र, हिंदू धर्मावर आघात करणाऱ्या कोणत्याही गोष्टींचा निषेध केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. लव्ह जिहादसारख्या घटनांविरोधात देखील वारकरी संप्रदाय ठाम भूमिका घेत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी देखील पवारांवर टीका केली. त्यांनी प्रश्न उपस्थित करत म्हटले की, पवारांनी कीर्तनकारांची वर्गवारी केली असल्यास ती यादी जाहीर करावी, म्हणजे कोणत्या कीर्तनकारांना आमंत्रित करायचे हे स्पष्ट होईल. या सर्व पार्श्वभूमीवर स्वतः शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, वारकरी संप्रदाय हा समतेचा संदेश देणारा आहे, मात्र काही प्रतिगाम विचारसरणीचे लोकं या प्रवाहात घुसखोरी करत आहेत.

सुमारे ६० टक्के लोकांच्या मांडणीतून धर्मांध शक्तींना बळ मिळत असल्याचे दिसून येत असून, पुरोगामी विचार मांडणाऱ्या कीर्तनकारांनी संख्या मर्यादित असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, या प्रबोधनाच्या कार्यात महिलांचा सहभाग वाढण्याची गरज असल्याचं देखील अधोरेखित केलं. या वक्तव्यामुळे वारकरी संप्रदाय, राजकारण आणि समाजप्रबोधन या तिन्ही पातळ्यांवर मोठी चर्चा रंगू लागली आहे.

Exit mobile version