सायली नलवडे-कविटकर
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आत्तापर्यंत इतर राजकीय पक्षांना वेळोवेळी राजकीय मैदानात लोळवलं; पण, त्यांच्या तालमीत तयार झालेले त्यांचे पुतणे अजितदादांनी त्यांना बाजूला करत यावेळेस राजकीय मैदान गाजवल्याचं चित्र आहे. कारण शपथविधीपूर्वीच पक्षाच्या संघटनेत बदल करुन अजितदादांनी स्वतःला पक्षाध्यक्ष केलं आहे. शिवाय पहिल्याच मेळाव्यात अजितदादांनी केलेल्या दमदार भाषणाने त्यांनी पवारांसोबत असलेल्यांसह त्यांच्यासोबत असलेल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना स्वतःकडे खेचण्याचा मार्ग सोपा केला आहे.
Chagan Bhujbal : राजकारणातून संन्यास घेणार का?, भुजबळांनी दिलं रोखठोक उत्तर
इतर राजकीय पक्षांमध्ये भूकंप घडवून आणण्याची खेळी शरद पवारांनी अनेकदा केली. पण, यावेळी त्यांनी स्वतःच बांधलेल्या, उभारणी केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांच्याच पुतण्यानं त्यांना आस्मान दाखवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर बुधवारी ज्यावेळी शक्तीप्रदर्शन करण्याची वेळ आली, त्यावेळी अजितदादांकडे ४० पेक्षा जास्त आमदार असल्याचे सिध्द झाले. याचाच स्पष्ट अर्थ असा की, शरद पवार यांच्याकडे उरलेले म्हणजेच केवळ 13 च्या आसपास आमदार शिल्लक राहिले आहेत. तरीसुद्धा एकूण राजकीय परिस्थिती लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते हे सत्तेच्या दिशेने म्हणजेच अजित पवार यांच्या दिशेने निघाले आहेत, तर कार्यकर्ते मात्र शरद पवार यांच्यावर कायम निष्ठा ठेवून आहेत !
अजितदादांनी पहिल्याच बैठकीत केलेलं भाषण अनेकांना भावणारं होतं. कारण अजितदादांचा स्वभाव संपूर्ण महाराष्ट्र जाणतो. या भाषणात अजितदादांनी व्यक्त केलेली खदखद ऐकणाऱ्यांना खरी वाटणारी होती. हे उत्स्फुर्त भाषण अजितदादांच्या पुढील वाटचालीची चुणूक दाखवणारं होतं. भावना, वस्तुस्थिती, अन्याय, संघटना, राज्याचा विकास, विविध दाखले देणारे हे भाषण राजकीयदृष्ट्या परिपूर्ण म्हणावे लागेल.
NCP : साहेबांनंतर आता दादांनीही दंड थोपटले, दिलीप वळसे-पाटलांसाठी बनले ढाल…
पेरलं ते उगवलं?
ऐन तारुण्यात म्हणजे अगदी बहरण्याच्या काळात महाराष्ट्राला बंडाची भाषा शिकवली, ती शरद पवार यांनीच ! त्यावेळी म्हणजे साधारण १९७८ च्या सुमारास विरोधी पक्ष अगदी कमकुवत होता आणि सगळीकडे काँग्रेस एके काँग्रेस, असे वातावरण होते. अशा परिस्थितीत शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत त्यावेळचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्याशी फारकत घेतली, आणि तेव्हाच्या जनसंघाबरोबर (आत्ताची भारतीय जनता पार्टी ) हात मिळवणी करून पुरोगामी लोकशाही दलाची स्थापना केली आणि अगदी लहान वयात मुख्यमंत्री होण्याचा विक्रम करून दाखवला.
जसजसे दिवस पुढे सरकत होते, तसतशी शरद पवार यांच्या राजकीय खेळी उघडकीस आल्या. कधी आपण आहोत त्या पक्षाला खिंडार पाडून, कधी स्वतंत्र पक्ष काढून अचूक संधी साधण्याची त्यांची किमया पूर्ण राजकीय पटलावर चर्चिली गेली. त्यातून एक सूर पुढे आला की, शरद पवार यांना घाबरले पाहिजे, कारण राजकारणाची उलथापालथ करून ते कसेही इप्सित साध्य करू शकतात. पण, ते हा मुद्दा विसरून गेले, की राजकारणातील त्यांची छबी ही अविश्वासाकडे म्हणजेच विश्वासघाताकडे वाटचाल करू लागली. शरद पवार काहीही करू शकतात, असे जे बोलले जायचे, त्या ऐवजी आता ते काही पण करू शकतात, या थराला राजकीय चर्चा जाऊ लागली !
साहेब, बडव्यांना बाजूला करा, आम्हाला आशिर्वाद द्या
अजितदादांचे बंड नियोजनबद्ध !
राज्याच्या राजकारणात गेल्या रविवारी अजितदादांनी जे बंड केले, ते पूर्वनियोजितच आहे यात शंका नाही. याचे कारण म्हणजे पार्टी ताब्यात घेण्याची प्रक्रिया अजितदादांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी ३० जून, २०२३ रोजीच सुरु केली, तीही आमदार-खासदार यांच्या सह्यांसह ! खरं तर हे खूप आधीच होण्याची शक्यता होती. पण एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे हा विषय मागे पडला असावा. ज्याप्रमाणे, आत्ता राजकारणात चर्चा होत आहे, त्यात डोकावल्यास अजितदादांच्या बंडाला शरद पवारांचा पाठिंबा आहे किंवा नाही, हे काळच ठरवेल. पण, अजितदादांनी मारलेला हा ‘मास्टर स्ट्रोक’ राज्याच्या नव्हे देशाच्या राजकारणात खोलवर ठसा उमटवून गेला आहे.
शरद पवार यांच्यासाठी नवीन काय?
राजकीय पक्षात फूट पडणे किंवा पाडणे हे शरद पवार यांना नवीन नाही. तब्बल साठ वर्षांच्या राजकीय जीवनात त्यांनी वसंतदादा पाटील, इंदिरा गांधी तर हल्ली हल्ली सोनिया गांधी यांना अचूक वेळ साधत झुकांडी देण्याचे कसब दाखवले आहे. बॅ. अंतुले यांनी मुख्यमंत्री असताना शरद पवारांच्या पक्षाचे ३५-४० आमदार फोडले, तेव्हाही पवार डगमगले नव्हते. तर, पुढच्याच निवडणुकीत त्यांनी त्याहीपेक्षा जास्त आमदार निवडून आणले होते, हा इतिहास अगदी ताजा आहे. त्यापूर्वी त्यांनी काँग्रेसच्या ४० आमदारांसह बंड करून वसंतदादांचे सरकार पाडले. १९९९ मध्ये विदेशी वंशाच्या मु्द्द्यावरून त्यांनी काँग्रेसमध्ये सोनिया गांधी यांच्याविरोधात बंडाचा झेंडा फडकवला. एवढेच काय, पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर यांना हाताशी धरून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यांच्या या डावपेचाला ‘ अमर-अकबर-अँथनी’ असे संबोधले गेले.
जयंत पाटलांची पवारांसमोरच अमोल कोल्हेंना ऑफर, हात जोडून आपला आदेश म्हणत ऑफरही मान्य
बंडखोरी आणि धाडस हे शरद पवारांच्या रक्तातच भिनले असल्याने आपल्या पुतण्याने म्हणजेच अजितदादांनी केलेल्या बंडानंतर ते डगमगले नाहीत. कराड येथे जाऊन कै. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले आणि त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला हाक देऊन पक्षाच्या पुन्हा संघटना बांधणीला प्रारंभ केला. अजित पवार हे आज ना उद्या भाजपच्या सरकारमध्ये सामील होणार, हा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला होताच, मुरब्बी आणि मुत्सद्दी राजकारण्यांना त्याची निश्चितपणे कल्पना असणारच !
ही फूट नसून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालो आहोत, असा यु्क्तिवाद अजितदादा व त्यांचे सहकारी करीत आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारच आहेत, अशीही ते पुष्टी जोडत आहेत. शरद पवार मात्र अजितदादांनी घेतलेल्या निर्णयाला आमचा पाठिंबा नाही असे बजावत आहेत. त्यांनी माझ्या फोटोचा वापर करू नये, अशी तंबी देखील अजितदादांना भरली आहे. एवढेच नव्हे तर पवारांनी अजित पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याविषयी तीव्र शब्दांत नाराजीदेखील व्यक्त केली आहे. तसेच पूर्वी अगदी विश्वासू असलेल्या पटेल आणि तटकरेंची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पण, उद्धव ठाकरे यांच्या प्रमाणे त्यांना गद्दार म्हणून संबोधले नाही. ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला त्यांना त्यांची जागा दाखवणार, असा निर्धार पवारांनी बोलून दाखवला आहे. अजितदादा व त्यांचे चाळीसच्या आसपास असलेले समर्थक आमदार हे भाजपसोबत गेल्याने शरद पवारांना आता संपूर्ण लक्ष राज्यात केंद्रित करावे लागणार आहे. शरद पवारांवर वयाच्या ८४ व्या वर्षी पक्ष वाचविण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावण्याची वेळ आली आहे.
दोन्ही गटांचा राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा; ठोठावलं निवडणूक आयोगाचं दार
अजितदादा पाचव्यांदा उपमुख्यमंत्री!
अजितदादांनी साडेतीन वर्षांत तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. २०१९ मध्ये प्रथम फडणवीस यांच्याबरोबर, नंतर ठाकरे यांच्याबरोबर आणि आता शिंदे यांच्याबरोबर. आजवर ते पाच वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आहेत. यावेळी ते उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानण्यासाठी नक्कीच आले नसणार ! राष्ट्रवादीच्या चार-पाच नेत्यांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशा चालू आहेत. ज्यांच्यावर भ्रष्टाचारी म्हणून आरोप झाले, ते आता सरकारचे भाग झालेत. ही तडजोड आहे की सौदेबाजी ? हा सर्वसामान्य नागरिकाला पडलेला प्रश्न आहे.
शरद पवार अनभिज्ञ कसे?
पटेल म्हणतात त्याप्रमाणे पक्षाच्या ५४ पैकी ५१ आमदार गेल्या वर्षापासून म्हणत आहेत की, आपण भाजपसोबत जाऊ या, बहुसंख्य आमदारांच्या भावना शरद पवार यांना समजल्या नाहीत का? देशाच्या राजकारणातील भीष्म आणि त्याच्याच तालमीत तयार झालेला अर्जुन यांचीही झुंज सुरूच राहिली तर, ती खरोखरच येणाऱ्या अनेक वर्षात चर्चिली जाईल. सध्या तरी जे चित्र दिसत आहे. त्यात पुतण्याने काकांना राजकारणाच्या या फडात चारी मुंड्या चीत केले आहे, हे निश्चित आणि जर भाजपाने अजितदादांना मुख्यमंत्री केले, तर शरद पवारांसाठी ही खूप मोठी धोबीपछाड असेल !
वरील प्रकाशित लेख आणि त्यातील मते लेखकाची वैयक्तिक असून, त्यास लेट्सअप मराठी सहमत असेलच असे नाही.